जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीच्या मनमानीला कंटाळून कर्मचारी सामूहिक रजेवर

0
8

भंडारा : वर्षभरापूर्वी रूजू झालेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधीक्षक डॉ. नलिनी भोयर यांच्या मनमानीला कंटाळून येथील अधिकारी व कर्मचारी शुक्रपासून सामूहिक रजेवर गेले. या प्रकारामुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली असून अधीक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी एकमेव मागणी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ शाखा भंडारातर्फे वरिष्ठांना करण्यात आली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना अधिकारी, कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्याने शेतीविषयक मुख्य कामे रेंगाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्षभरापर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून डॉ.नलिनी भोयर या रूजू झाल्या. परंतु कर्मचाऱ्यांच्या मते, जेव्हापसून त्या रूजू झाल्या तेव्हापासून त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अपनामास्पद वागतात.

प्रशासकीय कामासंदर्भात कारण नसतानाही अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. काही महिन्यांपासून त्यांच्या या वर्तवणुकीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ पोहचिवण्याच्या दृष्टीने छळ करीत असतात.

यात, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ थांबविणे, बिनपगारी करणे, वार्षिक वेतनवाढ थांबविण्याच्या धमक्या देणे, सुडबुद्धीने कर्मचाऱ्यांचा पगार थांबविणे, पदोपदी बोलण्यावरून अपमानित करणे आदींचा समावेश आहे. त्यांच्या या वागणुकीबाबत आॅक्टोबर महिन्यातही महासंघातर्फे वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र तेव्हाही कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. परिणामी त्यांच्या या अपमानास्पद कृतीमुळे त्यांची तात्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ शाखा भंडारातर्फे करण्यात आली आहे.