गोंदिया- आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे. तेथेच उकाडा असह्य होत असून, त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तापत्या उन्हामुळे शेतातील पाणी जिरले असून, वेळीच पाऊस न पडल्यास मात्र पिके हातून जाण्याची स्थिती आहे. मागील दहा- बारा दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले, यात शंका नाही. मात्र, एकदा पावसाने दडी मारली व तीच परिस्थिती आता निर्माण होताना दिसत आहे. पाऊस बरसत नसून त्यात ऊन तापून तापमान ३३ अंशावर आले आहे. परिणामी, शेतातील पाणी जिरले असून, पिकांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर उन्हामुळे पिके सुकणार, अशी स्थिती तयार होत आहे.
मागील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १,३६४.३ मिमी पाऊस बरसला होता, तर यंदा ८१६.३ मिमी पाऊस बरसला आहे. यानंतर यंदा सरासरी ५४८ मिमी पावसाची तूट दिसून येत आहे. जसेजसे दिवस वाढत आहेत, तसतशी ही तूट वाढत चालली आहे.