प्रेमविवाह करा; पण आई-वडिलांची परवानगी असेल तरच विवाहाची नोंद

0
14

सालेकसा,दि.04: प्रेमविवाह करा; परंतु तुमच्या प्रेमविवाहाला आई-वडिलांची परवानगी असेल तरच ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंदणी करण्यात येईल. असा ठराव तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायत ग्रामसभेत एकमताने घेतला.त्यामुळे आता प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामपंचायतच्या रजिस्टरवर त्यांची विवाह नोंदणी होणार नाही. असा ठराव घेणारी नानव्हा ग्रामपंचायत ही कदाचित राज्यातील पहिली ग्रामपंचायत असावी.

गावात यापुढे कुणाला प्रेमविवाह करायचा असेल तर नियोजित वधू-वराच्या आई-वडिलांचे परवानगी पत्र अनिवार्य केले आहे. दरम्यान, या ठरावानुसार आई-वडिलांचे परवानगीचे पत्र असेल तरच विवाहाची नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी करण्यात येईल. त्यांनाच विवाह केल्याचा दाखला मिळेल असा ठरावही ग्रामसभेत पारित करण्यात आला. या ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा तयार करून आदर्श कुटुंब पद्धती अमलात यावी, यासाठी आता मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांनादेखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, तसेच ग्रामपंचायत पारित केलेल्या ठरावाची प्रत पाठवून याची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्याची मागणी करणार असल्याचे सरपंच गौरीशंकर बिसेन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवेय? आधी वृक्ष लावा

विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या घरासमोर नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखविल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

टोकाचे पाऊल उचलतात म्हणून ठराव

प्रेमविवाहामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक मानहानी होत असल्याने आई-वडील टोकाचे पाऊल उचलतात. अशा घटनांना आळा बसावा याकरिताच प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी गरजेची असल्याचा ठराव ग्रामसभेने पारित केला आहे.

– गौरीशंकर बिसेन, सरपंच, ग्रामपंचायत नानव्हा