भारत राखीव बटालियन येथे रक्षाबंधन साजरा

0
14

गोंदिया, दि.5 : भारत राखीव बटालियन क्रमांक दोन राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १५ बिरसी कॅम्प गोंदिया येथे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय गोंदिया यांच्या वतीने बटालियनच्या अधिकारी व जवानांना राख्या बांधल्या. हा कार्यक्रम बटालियनचे समादेशक अमोल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

          जीवनात तणाव, राग, व्यसनाधीनता व दुर्गुणांचा त्याग ही सर्वात मोठी भेट असून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीसाठी ही अनोखी भेट असेल अशा भावना ब्रह्मकुमारी रत्नमाला दीदी गोंदिया सेंटर प्रमुख यांनी व्यक्त केल्या. कामठा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी वैशाली दीदी व नम्रता दीदी यांनी सुद्धा उपस्थितांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे तणावमुक्त जीवन कसे जगावे व तणावमुक्तीसाठी कुठले योग करावे याविषयी मार्गदर्शन केले.

          कार्य आणि कुटुंब यामध्ये योग्य ताळमेळ ठेवल्यास आपण तणावमुक्त राहू शकतो. अनेकवेळा कामाचा ताण आपण घरी घेऊन जातो, त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. ही परिस्थिती टाळायची असल्यास योग आणि ताळमेळ आवश्यक असल्याचे अमोल गायकवाड यांनी सांगितले. आपल्या मनात येणारे विचार मग ते सकारात्मक असो अथवा नकारात्मक इतरांशी शेअर केल्याने अनेक समस्या व प्रश्न सुटू शकतात असेही त्यांनी सांगितले. या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या सदस्यांचे अभिनंदन करून आभार मानले. ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या या ऋणातच राहणे आवडेल असे भावनिक उदगार त्यांनी काढले. ज्या जवानांना बहीण नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. देशातील प्रत्येक बहिणीच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे वचन जवानांनी यावेळी दिले.

          बटालियनचे समादेशक सहाय्यक प्रमोद लोखंडे, कैलास पुसाम, कमलकांत सिंग, पोलीस निरीक्षक मडावी, पोलीस उपनिरीक्षक समर यादव, राम यादव, गजू वैद्य, प्रशांत नारखेडे, सचिन चरडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. समन्वय अधिकारी म्हणून बटालियनकडून पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण व ब्रह्मकुमारी यांचेकडून सरिता राहांगडाले यांनी विशेष भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाला बटालियनचे अधिकारी, कर्मचारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.