गोंदिया : शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बिरसी येथील १०६ कुटुंबांचे विमानतळ विस्तारीकरणासाठी इतरत्र पुनर्वसन करण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी पुनर्वसन केले त्याठिकाणी रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आता पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी ग्राम पंचायतीने निवेदनही दिले आहे.
बिरसी (कामठा) येथील इंग्रजकालीन विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्याकरिता बिरसी गावातील १०६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करताना त्याठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. पुनर्वसित ग्रामस्थ आणि बिरसी ग्रामपंचायतीतर्फे शासन आणि विमानतळ प्रशासनाकडे अनेकदा मागण्या करण्यात आल्या. परंतु त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. आता मात्र ग्राम पंचायतीने आरपारचा लढा लढण्याची तयारी केली आहे. पायाभूत सुविधा तत्काळ पुरविण्यात याव्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि विमानतळासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यासंदर्भात खासदार सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल, गोंदिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि विमानतळ प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
पुनर्वसन केलेल्या ठिकाणी पायाभूत सोयी-सुविधांसाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र शासन आणि विमानतळ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नाईलाजास्तव आता आंदोलन करावे लागणार आहे, असे सरपंच उमेशसिंग पांडेले यांनी सांगितले.आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ सप्टेंबरपासून आंदोलन तीव्र करू व प्रसंगी बिरसी विमानतळावरून एकही प्रशिक्षण विमान उडू देणार नाही. तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, उपोषण, चक्काजाम आंदोलन आणि वेळ आली तर सामूहिक आत्मदहनदेखील करण्यात येईल. हे करूनही आमच्या मागण्या पूर्ण झाली नाही तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा मानस संपूर्ण गावकऱ्यांचा आहे, असे उपसरपंच संतोष सोनवाने यांनी सांगितले.