मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप; शेकडो शिक्षक सहभागी
गोंदिया, ता. ५ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत शिक्षकांनी मंगळवारी (ता. ५) शिक्षकदिनी सामूहिक किरकोळ रजा आंदोलन केले. येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र आलेल्या शेकडो शिक्षकांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, मुख्यालय निवासस्थानाची अट रद्द करणे, नवीन शिक्षक भरती तातडीने करणे, बदलीचे नवीन प्रस्तावित धोरण रद्द करणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना तातडीने देणे, दारिद्र्यरेषेखालील मुलींना दिला जाणारा दैनिक एक रुपया भत्ता वाढवून किमान पंचवीस रुपये करणे, विषय पदवीधर शिक्षकांना समान न्यायाची पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारीपदासाठी बी. ए्ड. ची अट असावी, नगरपालिका, महानगरपालिका शिक्षकांना सातव्या वेतन आयोगासोबतच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करावी, वसतिशाळा शिक्षकांची मूळ सेवा विचारात घ्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बॅनरखाली शिक्षकांनी सामूहिक किरकोळ रजा आंदोलन केले. आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.