जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर “आयुष्मान भव” मोहीम

0
10

1209 आजारांच्या मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढा

डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी

गोंदिया-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्यमान भारत योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत रुग्णांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमाच्या माध्यमातून एकूण 1209 उपचार, शस्त्रक्रिया मोफत दिले जात असल्याची माहिती डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवण्यात येवुन नियोजन करण्यात आलेले आहे. विशेष आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी 3.0 ,आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.
दि. 1 सप्टेंबर आयुष्मान भव मोहिम उद्घाटन प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात  आयुष्मान कार्डाचे जनजागृती करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक संकेत मोरघरे, जिल्हास्तरिय पर्यवेक्षक मिलिंद नंदागवली, संजय बिसेन,शरदचंद्र रहांगडाले.
जिल्ह्यात 791131 लोकांपैकी 232976 नागरिकांना आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले असुन  उर्वरीत शिल्लक लोकांनी आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्र येथे जावुन आयुष्मान कार्ड काढ्ण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी हे 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणनेच्या आधारावर असून या यादीत नाव असणारा व्यक्ती या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरिता आयुष्यमान कार्ड ची आवश्यकता आहे. हे कार्ड सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र किंवा या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये काढण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ही यादी गावनिहाय किंवा वार्ड निहाय https//aapkedwarayushman.pmjay.gov.in या लिंकवर सुद्धा नागरिकांना उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केशरी, पिवळे ,अंतोदय आणि अन्नपूर्णा रेशन कार्डधारक कुटुंबे पात्र लाभार्थी असून यात एकूण 996 उपचार शस्त्रक्रियेकरिता प्रती वर्ष/ प्रती कुटुंब 1.5 लाखांचा आरोग्य विमा पुरविण्यात येत आहे. महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत साडेतीन लाख असे एकूण पाच लाखापर्यंतचे उपचार आरोग्य विमाच्या माध्यमातून मोफत होतात. त्यामुळे उपचारापूर्वी आपले नाव आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे त्यांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मोफत मिळणार आहे.
कोणत्या रुग्णालयात मिळणार उपचार-
या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात एकूण बारा रुग्णालय अंगीकृत असून त्यापैकी सहा शासकीय व सहा खाजगी रुग्णालय आहेत.यात गोंदिया शहरातील  न्यू गोंदिया हॉस्पिटल,ब्राह्मणकर हॉस्पिटल, बाहेकर हॉस्पिटल,बालाजी नर्सिंग होम, रिलायन्स हॉस्पिटल तर शासकीय  कुवर तिलक सिंह सरकारी रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय देवरी, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी यांचा समावेश आहे.
इथे करता येईल नोंदणी-
जिल्ह्यात 1327 ठिकाणी नोंदणीची सोय करण्यात आली आहे त्यात आपले सरकार केंद्र,सीएससी केंद्र व ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र उपलब्ध आहेत.या केंद्रावर लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक जात निहाय जनगणना 2011 च्या यादीत नाव असेल तर आधार कार्ड आणि राशन कार्ड च्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड प्राप्त करता येते तसेच यादीत नाव नसेल तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. 2011 च्या जनगणनेनुसार सामाजिक, आर्थिक जातनिहाय जिल्ह्यातील पात्र लाभार्थी यादी ग्रामपंचायत व शहरी वार्ड कार्यालय येथे उपलब्ध आहे.
या आजारांवर होतील मोफत उपचार-
कॅन्सर ,हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्र मार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जा संस्था विकार, अस्थिव्यंग, जठर, आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावरील उपचार, एंडोस्काईन, इंटरव्हेशनल रेडिओलॉजी व आदी. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रितपणे राबवित आहेत. महात्मा फुले योजनेअंतर्गत दीड लाख तर आयुष्यमान योजनेतून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत होत आहेत. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेऊन उपचारावरील होणारा आपला खर्च टाळावा.
– नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
अधिक माहितीसाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील आरोग्यमित्र यांना भेट द्यावी किंवा 155 388 / 1800 2332 200 या विनाशुल्क दुरध्वनीवर संपर्क साधावे.तसेच www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
                 – योजना समन्वयक डॉ.जयंती पटले