ओबीसी क्रांती मोर्चाही आक्रमक, वैनगंगेत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करणार !

0
6

भंडारा-महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेला वाद आता पूर्व विदर्भातील भंडाऱ्यातही पोहोचला. असून मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक संजय मते यांनी आज (ता. आठ) हा इशारा दिला. या संघटनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात एल्गार पुकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पेटलेला वाद सध्या तरी मिटेल, असे दिसत नाही. या इशाऱ्याने भंडारा पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनाचे टेंशन वाढले आहे.

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी पेटून उठला आहे. भंडारा बीसी क्रांती मोर्चाने उडी घेतली. मराठा समाजाला ओबीसीत त्यातही कुणबी समाजात समाविष्ट केल्यास सर्व ओबीसी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करणार आहेत.तिकडे मराठा नेते मनोज जरांगे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण इकडे ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा दिलेला इशारा यामुळे सरकार आणखी पेचात पडले आहे. यासंदर्भात संजय मते म्हणाले, आधीच ओबीसी प्रवर्गात ४५० जातींचा समावेश आहे. सत्तरी ओलांडली तरी ओबीसी समाजाचा अजून विकास झालेला नाही.

ओबीसी प्रवर्गात आता पुन्हा एका समाजाची भर पडणे ओबीसी समाजाला परवडणारे नाही. शिंदे सरकारला ओबीसी समाजाकडे लक्ष द्यायला वेळ नसताना कोणत्या अधिकाराने ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घाट घालत आहात, असा परखड सवाल मते यांनी केला. ओबीसींवर आताही अन्याय करणार असाल तर येत्या निवडणुकीत त्याची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.

आगामी पोळा, गणपती आदी उत्सवाच्या काळात आधीच पोलीस यंत्रणेवर ताण आहे. त्यात ओबीसी क्रांती मोर्चाने सामूहिक आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. जालन्यानंतर राज्याचे लक्ष आता भंडाऱ्याकडे राहणार आहे.