उषाकिरण आत्राम यांच्या दोन कथांचा आंतरराष्ट्रीय कथासंग्रहात समावेश

0
10

गोंदिया:- कोलकाता येथून नुकतेच प्रकाशित झालेल्या *’दक्षिण वारेटर गोलपो’* या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रातिनिधिक कथासंग्रहात आदिवासी भाषा संशोधन प्रकल्प धनेगावच्या (कचारगड) संचालक जिवनमित्र उषाकिरण आत्राम यांच्या दोन कथांचा समावेश आहे. या कथा तमाम आदिवासींच्या जीवनसंघर्षाचे प्रतीक आहेत. ही बाब गोंदिया जिल्ह्यासाठी, आदिवासी व त्यांच्या साहित्यासाठी गौरवास्पद मानण्यात येत आहे.
त्यांच्या ‘अपराध किसका, सजा किस्को?’ या कथेचा अनुवाद आयपीएस अधिकारी प्रद्युमन भट्टाचार्य यांनी इंग्रजी व बंगाली भाषेत तर ‘भूक’या कथेचा अनुवाद शामली रक्षित यांनी केला आहे. जागतिक दर्जाच्या या कथासंग्रहात कन्नड, तुलु, तेलगु, मल्यालम आदी विविध भाषांतील कथांचा समावेश आहे. या कथांचे संपादन बिताष्टा घोषाल यांनी केले असून कोलकाता येथील साहित्य अकादमीचे देवेश सर यांचे मार्गदर्शन आणि सौजन्याने सदर कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. याबद्दल उषाकिरण आत्राम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. उल्लेखनीय असे की त्यांच्या कवितांसोबत कथासुद्धा मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेड, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहेत.
उषाकिरण आत्राम यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल प्राचार्य माणिक गेडाम, प्रा.डॉ.वैजनाथ अनामुलवाड, प्रभू राजगडकर, रमेश कासा, वॉल्टर भेंगरा, तुलसीदास कोडापे तसेच राणी दुर्गावती महिला मंडळ व बिरसा ब्रिगेड महिला मंडळाच्या मालती किन्नाके, हेमलता आहाके, गीता सलाम, वनिता सलाम, लता मडावी, सरिता भलावी, बिंदू कोडवते आदींनी अभिनंदन केले आहे.