उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करा- पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

0
9

. शांतता समितीची बैठक

          गोंदिया, दि.14 :  तान्हा पोळा, मारबत, गणेशोत्सव, ईद व शारदा उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नागरिकांना केले. सामाजिक एकोपा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनी खबरदारी व जबाबदारी घ्यावी तसेच ध्वनीप्रदुषण, वायुप्रदुषण टाळण्यावर भर देण्यात यावा असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

         समाज प्रबोधन व सामाजिक ऐक्य या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गोंदिया जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून येऊ घातलेले सर्व उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने आवाहन केल्याप्रमाणे पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

        गणेशोत्सव व ईद हे सण सोबतच येत असल्यामुळे शांतता समितीच्या सदस्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहील या अनुषंगाने सदस्यांनी जनजागृती करावी असे ते म्हणाले. प्रत्येक समाजाच्या भावनांचा आदर करणे आपले कर्तव्य असून या निमित्ताने सामाजिक एकोप्याचे दर्शन प्रत्येकाने घडविले पाहिजे असे ते म्हणाले. अनेक सण उत्सव एकाचवेळी आल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे ते म्हणाले.

        अफवांवर विश्वास ठेवू नका :- उत्सवाच्या काळात समाज माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व खोट्या बातम्या काही लोक पसरविण्याची शक्यता असते. अशा पोस्ट खात्री केल्याशिवाय शेअर करू नका. कुणाच्या भावना दुखावतील व त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती आपल्या हातून घडू नये यासाठी नागरिकांनी सजग रहावे असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.

        सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट ठरलेल्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनातर्फे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा असे त्यांनी सांगितले. उत्सवादरम्यान प्रशासनाचे मंडळांना पूर्ण सहकार्य राहीलच मात्र नागरिकांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे त्या म्हणाल्या.

         परवानगीसाठी एक खिडकी योजना :- गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळण्यासाठी नगरपालिकेने एक खिडकी योजना सुरू केली असून परवानगीमध्ये नमूद अटी व शर्तीनुसार कार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी केले. रहदारीचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. मंडपात अग्निशमन यंत्र बसविण्यात यावे असेही चव्हाण म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.

         शांतता समितीच्या सदस्यांनी बैठकीत महत्वपूर्ण सूचना केल्या. गणेश विसर्जन व ईद हे सण एकाचवेळी येत असल्याने सर्वांनी एकोप्याने साजरे करण्यावर बैठकीत सहमती दर्शविली. बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.