वाशिम दि.१४ -शहीद आकाश अढागळे यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी १३ सप्टेंबर रोजी शिरपूर येथे आणले असता जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी पुष्पचक्र वाहिली.यावेळी आमदार अमित झनक,माजी आमदार ऍड.विजय जाधव,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी,सुभेदार कुलदीपसिंग, वीरमाता विमलबाई अढागळे, वीरपत्नी पत्नी रुपाली अढागळे, आजी माजी सैनिक संघटनेचे श्री.भगत यांनी देखील पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
१० सप्टेंबर रोजी देशाच्या सीमेवरील लेहच्या सियाचीन भागात कर्तव्यावर असतांना मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथील भारतीय सैन्यातील जवान आकाश अढागळे पहाडावरून पडून गंभीर जखमी झाले होते.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भाऊ नितीन आणि मुलगी तन्वी यांनी शहीद आकाशच्या पार्थिवाला अग्नी दिला.शहीद आकाशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी बंदुकीच्या २१ फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.शहीद आकाश अढागळे अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.रात्री १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिरपूर (जैन) ग्रामस्थ व परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.