वाशिम दि.24 – वाशीम जिल्हा परिषद व पंचायत समिती वाशिमच्या वतीने ‘स्वच्छता रन’ चे आयोजन आज वाशिम येथे करण्यात आले. या स्वच्छता रनमध्ये लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी,विविध शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी,लोककलावंत,महिला बचतगट महिलांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा जागर केला.
स्वच्छता हीच सेवा या अभियानातअंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा केला जात आहे.आज पंचायत समिती वाशीमच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता रन’ चे आयोजन करण्यात आले.
वाशीम पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय या २ किमी अंतराच्या या स्वच्छता रनमध्ये
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड व पंचायत समिती सभापती सावित्री वानखेडे,जिल्हा स्वच्छता मिशनचे राम शृंगारे, सुमेर चानेकर यांनी ‘स्वच्छता रनला’ हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
यावेळी उपस्थित जिल्ह्यातील विविध लोककलावंतांनी स्वच्छता रनमध्ये विविध गिते सादर करून स्वच्छतेवर जनजागृती केली.संत गाडगेबाबांच्या भुमीकेतील पी. एस खंदारे यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गीताच्या माध्यमातून स्वच्छता कीर्तन सादर केले.शिक्षक दिगांबर घोडके यांनी स्वच्छता गीताच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी सगळ्यांनी स्वच्छतेची कास धरावी असे आवाहन यावेळी पोवाड्यातुन केले.
वाशीम पंचायत समिती अंतर्गत २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छतेचा जागर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहभागी होण्याचे आवाहन गटविकास अधिकारी श्री.तोटेवाड यांनी केले.