नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तत्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी श्री. फडणवीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.
झालेल्या नुकसानीसंदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून या नुकसानीसंदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल. जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी श्री. फडणवीस यांनी दिली.
#नागपूर उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज पुरामुळे नुकसान झालेल्या महानगरातील वस्त्यांना भेटी दिल्या. अनेक नागरिकांनी आग्रहाने घरात घेऊन जात त्यांना कालच्या घटनेची भीषणता दाखवली. अंबाझरी तलाव ते परिसरातील सर्व भागांची त्यांनी पाहणी केली.@InfoVidarbha @MahaDGIPR @ngpnmc pic.twitter.com/GJslyKkbcW
— DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@InfoNagpur) September 24, 2023
नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. एका तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही, याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी, डागा लेआउट, शंकर नगर आदी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.