वर्धा : शाळेत मुलांना शिकविण्यास शिक्षक नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात आंदोलन उभारले. प्रतिसाद न मिळाल्याने हिंगणघाट तालुक्यातील धोची येथील शाळेस कुलूप ठोकले.
ही पोहणा केंद्रातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत पाच वर्ग असून एकच शिक्षक मुख्याध्यापक पद तसेच सर्वेक्षण, माहिती संकलन, विविध प्रकल्प, पोषण आहार व अन्य जबाबदाऱ्या सांभाळतो. त्यामुळे शिकविण्याचे कार्य ठप्प पडले आहे. गत तीन महिन्यांपासून गावकरी शिक्षक नेमण्याची मागणी करीत आहे. शेतमजुरांच्या मुलांनी शिकू नये का, असा सवाल करीत शेवटी शाळेस टाळे ठोकण्यात आले.येत्या तीन दिवसांत नेमणूक न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वांदिले यांनी दिला. दशरथ ठाकरे, ओंकार मानकर, माजी सरपंच प्रकाश बावणे, सरपंच नीतू डंभारे, उपसरपंच मोतीराम देवडे, शाळा समितीच्या रुपाली नरुले, गजानन कौसर, वंदना नैताम, माधुरी नेवाडे, दिपाली डंभारे, निलेश इंगळे, प्रशांत दाते, मनोहर बावणे, सुनील साठे, अतुल कोल्हे आदींनी नेतृत्व केले.