ओबीसी आंदोलकांची खा. सुनील मेंढे यांनी घेतली भेट

0
5

भंडारा-मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील ओबीसी बांधव काही मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला बसले होते. या आंदोलकांची खा. सुनील मेंढे यांनी भेट घेत ओबीसी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे आरक्षण संकटात येण्याची चिन्हे दिसू लागताच राज्यभर ओबीसी बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू झाली आहेत. भंडाऱ्यातही साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलकांची खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. या आरक्षणाच्या लढ्यात मी सदैव तुमच्या सोबत आहे असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. आंदोलकांच्या या मागणीशी आपण पूर्णपणे सहमत असून यासाठी आपण एकत्र लढा देऊ असेही चर्चेत सांगितले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचा विषय लवकर निकाली निघावा, अशी आंदोलकांची मागणी होती. त्या दृष्टीने तत्काळ बैठक बोलून 1 ऑक्टोबर पासून ओबीसी मुला मुलींच्या वस्तीगृहात प्रवेश नोंदणीला सुरुवात होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत असे निर्देश आंदोलन स्थळावरून दूरध्वनी द्वारा मा जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी आंदोलकांचे जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणेही करून दिले. मुंबई येथे 29 रोजी होणाऱ्या बैठकीत भंडारा जिल्ह्याच्या दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची संधी मिळावी असा आग्रह आंदोलकांचा होता. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून आपली मागणी पोहोचवली जाईल व भंडारा-गोंदिया जिल्ह्याला बैठकीत प्रतिनिधीत्व मिळावे या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न केला जाईल असेही यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलकांना सांगितले.