32.6 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात 20 जून रोजी वार्षिक सारस पक्षी गणना

गोंदिया जिल्ह्यात 20 जून रोजी वार्षिक सारस पक्षी गणना

0
30

गोंदिया, दि. 18 जून 2026 : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक सारस पक्षी गणनेचे आयोजन करण्यात आले असून ही गणना शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात सारस पक्ष्यांचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये आढळते. तसेच मध्य प्रदेशातील लगतच्या बालाघाट जिल्ह्यातही सारस पक्ष्यांची उल्लेखनीय संख्या आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सारस पक्षी गणना आयोजित करण्यात येते तसेच वर्षभर विविध संरक्षणात्मक उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमांतर्गत दि. 19 जून रोजी बालाघाट जिल्ह्यात आणि दि. 20 जून रोजी गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी गणना करण्यात येणार आहे. ही गणना सेवा संस्था, गोंदिया वनविभाग, बालाघाट वनमंडल, स्थानिक सारस मित्र, स्वयंसेवी कार्यकर्ते तसेच शेतकरी यांच्या संयुक्त सहभागातून पार पडणार आहे.
सारस पक्षी गणनेद्वारे सारसांची अचूक संख्या, त्यांचे अधिवास, प्रजनन क्षेत्रे तसेच संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती संकलित केली जाते. या माहितीच्या आधारे सारस संवर्धनासाठी प्रभावी कार्यपद्धती निश्चित करण्यात मदत होते.
गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्षी गणना गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. पवनकुमार जोंग, सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. सावन बहेकार, सेवा संस्थेची संपूर्ण टीम, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक सारस मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सारस पक्ष्यांच्या संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविणे, त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे आणि वैज्ञानिक माहिती संकलित करणे हा या वार्षिक गणनेचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे सारस संवर्धनाला अधिक बळ मिळत असून स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती होण्यासही मदत होत आहे.