अर्जुनी मोर.:- अनेक वर्षापासून रखडलेल्या केशोरी बायपास रस्त्याच्या मंजुरीसाठी शासनाने ३.५ कोटी रुपये मंजूर केले. या रस्त्याच्या मागणीसाठी माजी जि प सभापती प्रकाश गहाणे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्ता मंजुर झाला. नागरिकांना होणा-या त्रासापासुन आता मुक्ती मिळणार असल्याने जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या केशोरी परिसरातील रस्ते खड्डेमय झाले. रस्ता दुरूस्तीकरिता अनेकदा मागणीही झाली. केशोरी बायपास रस्ता मंजूर करून भूसंपादन करण्यात आले. मात्र निधी उपलब्ध होत नव्हता. या क्षेत्राचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे यांनी गोंदियाचे तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना २१ मे २३ ला या संदर्भात निवेदन दिले. सविस्तर चर्चा करून रस्त्याकरिता २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली.पालकमंत्र्यानी त्याच दिवशी या पत्राची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदियाचे अधिक्षक अभियंता यांना या संदर्भात पत्र लिहुन तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
शासनाने मागणी मान्य करीत केशोरी, शिरोली, इटखेडा, कन्हाळगाव ते लाखांदूर या मार्गासाठी ३.५ कोटी मंजूर केले. या रस्त्याच्या बांधकामासाठी ३ जुलै २३ला प्रशासकीय मंजुरी दिली. प्रकाश गहाणे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. यामुळे परिसरात आनंद व्यक्त होत असून परिसरातील जनतेने प्रकास गहाणे यांचे आभार व्यक्त केले आहे.