नवरात्रीनिमित्त विशेष हातमाग प्रदर्शनाचा लाभ घ्यावा – वस्त्रोद्योग आयुक्त गाडीलकर

0
2

नागपूर, दि. 16 : नवरात्री सणाच्या शुभारंभप्रसंगी १५ व १६ ऑक्टोबरला राज्य हातमाग महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हातमाग प्रदर्शनाचा लाभ नागपूरकरांनी घ्यावा. मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे नवरात्री निमित्त गोंडवाना गॅलरी, रामदासपेठ नागपूर येथे राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मीना सूर्यवंशी, शालिनी इटनकर तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवरात्रीनिमित्त महिलांसाठी विशेष आयोजनाचा याचा मुख्य हेतू असल्याचे श्री. गाडीलकर  म्हणाले. खादी वस्त्रोद्योग हा देशातील महत्त्वाचा उद्योग असून पर्यावरणपूरक आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे, हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन असून निशुल्क प्रवेश आहे. यामध्ये खादीपासून तयार केलेल्या साड्या, चादरी, कुर्ती तसेच विविध प्रकारचे खादीचे कापड विक्रीसाठी आहेत, नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.