महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांचे निर्देश
नागपूर दि. 18 ऑक्टोबर: शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना-2.0 साठी निवड करण्यात आलेल्या नागपूर आणि अमरावती परिमंडलातील उपकेंद्रांसोबतच त्यातून निघणा-या वीज वाहिन्यांच्या सक्षमीकरणाची कामे युध्दपातळीवर पुर्ण करा. या कामांसाथी निश्चित करण्यात आलेल्या कृती मानकांचे तंतोतंत पालन करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.
महावितरणच्या काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ कार्यालयात मंगळवारी (दि. १7) रोजी आयोजित नागपूर आणि अमरावती परिमंडलाच्या आढावा बैठकीत संचालक श्री. ताकसांडे बोलत होते. या बैठकीला नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपूर आणि अमरावती परिमंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी या दोन्ही परिमंडलातील 255 उपकेंद्रांमध्ये सौर ऊर्जेसंदर्भात पूर्वतयारीची दुरूस्तीची व सक्षमिकरणाची विविध कामे सुरु आहेत. ही कामे येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना देतांनाच ही सर्व कामे मुख्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून गुणवत्तापुर्वक कामे करण्याच्या सुचना देखील श्री ताकसांडे यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत श्री ताकसांडे यांनी कृषी पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्याचा जिल्हानिहाय आढावा घेतला आणि प्रलंबित कृषी पंपाच्या वीज जोडणी देण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत प्रतिक्षा यादी शुन्य करण्याचे देखील सांगीतले. याशिवाय पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ग्राहकांनी निश्चित शुल्काचा भरणा केल्यानंतर तात्काळ नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे, तसेच मागेल त्याला त्वरीत वीज जोडणी देता यावी यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. इज ऑफ लिव्हिंग नुसार ग्राहकांना गतीमान सेवा देण्यावर जोर द्यावा, ग्राहकांच्या वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारी, अचूक बिलिंगसह इतरही विविध तक्रारींची दखल घेत त्यांचे तत्परतेने आणि वेळेत निराकरण करण्यासाठी स्थानिक यंत्रणेने अधिक संवेदनशील व सजग राहिले पाहिजे. येणा-या रब्बी हंगामाचा काळ बघता कृषी रोहित्र नादुरुस्त होणार नाही यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे कामे ताबडतोब करण्यात यावी. रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण आटोक्यात राहील या उद्दिष्टाने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी प्रत्येक महिन्यात सर्व प्रकारच्या वर्गवारीतील ग्राहकांकडून शंभर टक्के वीजबिल वसुली होणे गरजेचे आहे. कार्यकारी अभियंता यांनी विभागानुसार योग्य नियोजन करत वीजबिल वसुलीला प्राधान्य द्यावे, वसुलीत हयगय सहन करण्यात येणार नाही अशा स्पष्ट सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
या बैठकीलाअधीक्षक अभियंते सर्वश्री हरीश गजबे, अविनाश सहारे अमित परांजपे, राजेश नाईक, प्रदिप घोरुडे, मंगेश वैद्य, सुनिल शिंदे, संजय खंगार, नारायण लोखंडे यांच्यासह नागपूर व अमरावती परिमंडलातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.