नागपूर विभागात प्रथम क्रमांक : सर्वोत्कृष्ट सादरीकरणात मोठे नाव
गोंदिया, दि.20 : सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थीनींनी लोकसंख्या शिक्षण या विषयांतर्गत नागपूर विभागीय स्तरावर पर्यावरण संरक्षण या विषयावर लोकनृत्य सादरीकरण करुन नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड करण्यात आली. अशी मोठी भरारी मारुन यशस्वी विजय प्राप्त केला.
यावेळी मंचावर उद्घाटक प्राचार्य डॉ. हर्षलता बुराडे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर, प्रमुख उपस्थितीत डॉ. राजकुमार अवसरे ज्येष्ठ अधिव्याख्याता, डॉ. गंगाधर वाळले ज्येष्ठ अधिव्याख्याता, श्रीमती बुरघाटे अधिव्याख्याता विभागप्रमुख, डॉ. अपर्णा शंखदरबार अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर, परीक्षक सीमा गोडबोले व सूचना भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शाळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाज कल्याण गोंदिया अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा ही शाळा उपक्रम राबविण्यात यशस्वी आहे. नानाविध अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. सदर विभागीय स्पर्धा राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर या ठिकाणी पार पडली. त्यावेळी विभागातील एकुण सहा जिल्ह्यातील लोकनृत्य सादरीकरण करणासाठी सहभागी झाले होते, त्यामधून डव्वा निवासी शाळेने विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
या लोकनृत्य स्पर्धेमध्ये दिया लाडे, राणु भैसारे, यामिनी खुटमोडे, आकांक्षा जांभुळकर, आस्था दहिवले, निताली बंसोड व मार्गदर्शक शाळेच्या मुख्याध्यापक संध्या दहिवले यांचा सहभाग होता. या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या दहिवले यांना देण्यात येते.
विभागात मोठी भरारी मारुन राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्यामुळे विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी शाळेच्या मुख्याध्यापक संध्या दहिवले व सहभागी विदयार्थीनींचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाचे प्राचार्य श्री. राऊत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख, गटशिक्षणाधिकारी श्री. बागडे पंचायत समिती सडक अर्जुनी व श्री. राऊत यांनी सर्वांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी आवेश राऊत, दिपक येवले व पंचशीला चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.