गोंदिया, ता. 23 : स्थानिक इंदिरा गांधी स्टेडीयम येथून बुधवारी (ता. 25) सकाळी 11.00 वाजता ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत जिल्हयातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.
‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांची माहिती देतांना श्री. रहांगडाले म्हणाले की, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढयात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे अमृत वाटीका तयार करण्यात येत आहे. या वाटीकेसाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत गावागावातून माती गोळा करण्यात आली. ही माती अमृत वाटीकेत वापरली जाणार आहे. गावातील अत्यंत शेवटच्या टोकावर राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. गोंदिया जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील नऊ अमृत कलशांमध्ये ही माती गोळा करण्यात आली असल्याचे सांगून या अमृत कलशांना आता राज्यस्तरावर मुंबईला पाठविण्यात येत आहे. त्यासाठीच अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या यात्रेत खासदार,आमदार, जिल्हाधिकारी गोंदिया, पोलिस अधिक्षक),मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सभापती, सर्व सदस्य, विविध विभागाचे विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढयात ज्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी या अमृत कलश यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पंकज रहांगडाले यांनी केले.
——-
अशी राहील यात्रा
अमृत कलश यात्रेनिमीत्त सर्व मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी यांना इंदिरा गांधी स्टेडीयम येथे गोळा होण्याचे विनंती पत्र पाठविण्यात आले. जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बचत गट, जिल्हा परिषदेचे कर्मचारी या अमृत कलश यात्रेत सहभागी होतील. दरम्यान स्टेडीयम येथे प्रंचप्राण शपथ घेतल्यानंतर नऊ अमृत कलशांची यात्रा काढण्यात येणार आहे. इंदिरा गांधी स्टेडीयम ते गोरेलाल चौक, दुर्गा चौक, पुढे कुडवा लाईन मार्गे ही यात्रा रेल्वेस्टेशनला पोहचेल. दरम्यान नऊ अमृत कलशांसह 18 स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक यां याना विदर्भ एक्स्प्रेसने रवाना केल्यानंतर अमृत कलश यात्रेचे समापन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.आर. खामकर यांनी दिली.