धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी गोंदिया ते नागपूर अतिरिक्त बसगाड्या

0
11

गोंदिया: येत्या २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात विजया दशमी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरला जाता यावे यासाठी गोंदिया एस.टी. आगाराकडून सहा अतिरीक्त बसेसची सुविधा केली आहे.

नागपूरच्या दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमाला रेल्वे, बससह खासगी वाहनांनी हजारो लोक हजेरी लावतात. अशा परिस्थितीत येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी रेल्वे तसेच राज्य परिवहन विभागाकडून अतिरिक्त व्यवस्था करण्यात येते. याबाबत गोंदिया एस.टी. आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी सांगितले की, गोंदिया आगारातून नागपूरपासून पुढे दररोज १९ बसेस धावतात. त्यात विजयादशमीच्या दिवशी प्रवासी मोठ्या संख्येने नागपूरला जातात. यावेळी बसेस कमी पडत असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.मात्र यंदा ही अडचण उद्भवू नये यासाठी धम्मचक्र प्रवर्तनदिनी गोंदिया आगारातून नागपूरसाठी ६ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.