. देवरी येथील जनता दरबारात पालकमंत्र्यांनी सोडविल्या नागरिकांच्या समस्या
गोंदिया, दि.२६ : ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालय देवरी येथे आयोजित जनता दरबारात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जनतेच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक विभागाने योग्य नियोजनासह अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
जनता दरबारात प्राप्त तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी त्या त्या विभागाने कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. नागरिकांच्या तक्रारींचे काय झाले या बाबतीत प्रत्येक महिन्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळीकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यावेळी उपस्थित होते.
मनरेगाचा, सामूहिक वनहक्क आराखडा, योजनांचा लाभ, आरोग्य सेवा बळकटीकरण, रोजगार निर्मिती, कृषी योजनांचा लाभ, शेतीच्या तक्रारी, सिंचन, शेती पंप देयक, आदिवासी विभागाचे प्रश्न यासह नागरिकांनी विविध समस्या व तक्रारी पालकमंत्र्यांकडे मांडल्या. नागरिकांच्या सर्व तक्रारींचे निराकरण करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. आजच्या जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून आपल्या तक्रारी व समस्या मांडल्या. नागरिकांच्या सर्व तक्रारी व समस्या तात्काळ निकाली काढण्यात येतील असे पालकमंत्री यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी श्री. खंडाईत यांनी केले. जनता दरबारात विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.