बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
देवेंद्र रामटेके
गोंदिया-(ता.4) मागच्या अनेक महिन्यापासून गोंदिया तालुक्यातील आसोली-नवरगाव(कला) रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून नागरिकांना चालणे दुरापस्त झाले आहे.असे असले तरी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.त्यामूळे परिसरातील नागरिकांत रोष दिसून आहे.
तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे. परिसरातील नवरगाव(कला),करंजी, कलीमाटी,पांजरा,घाटटेमनी, गिरोला,तसेच कामठा परिसरातील अनेक गावातील नागरिक गोंदियाला येण्या-जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करतात. तसेच या मार्गावर मोठया प्रमाणावर शाळकरी मुलांची वर्दळ असते.या शिवाय या मार्गावरून जड वाहने वाहतूक करीत असतात. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. जड वाहन आले की प्रवाशांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत असते.मध्यंतरी या मार्गावर अपघात ही घडले असल्याचे दिसून आले.असे असले तरी बांधकाम विभागाने सदर मार्ग दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही.कदाचित बांधकाम विभाग या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची तर वाट तर पाहत नाही ना?अशी बोलकी प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
दिवाळीनंतर या भागातील गावागावात अनेक मोठ्या जत्रांचे(मंडई)आयोजन होत असते.या मंडई मध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात.अशात रात्री-अपरात्री एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.