बल्लारशाह रेल्वेमार्गावरील प्रवास कंटाळवाणा; युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वरत्न रामटेके यांचा आंदोलनाचा इशारा

0
16

गोंदिया- : मागील पंधरा दिवसांपासून बल्लारशाह गोंदिया व गोंदिया- बल्लारशाह पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडी उशिरा धावत असल्यामुळे रेल्वेप्रवासी कंटाळून गेले आहेत. रेल्वे विभागाने रेल्वे गाडीचे वेळापत्रक पूर्ववत करावे, अन्यथा तिव्र आंदोलन करू, असा इशारा युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वरत्न रामटेके यांच्यासह प्रवाशांनी दिला आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून गोंदिया ते चंद्रपूर बल्लारशाह पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडी धावत आहे. अनेकांनी पिढ्यान् पिढ्या या रेल्वेगाडीने प्रवास केला आहे. परंतु, कधीकधी पूर्ण आठवडाच सर्व प्रवासी रेल्वे उशिरा धावत असल्याने नियमित प्रवास करणारे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. दररोज ये-जा करणारे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. तासन् तास रेल्वेगाडीची वाट पाहणे, रेल्वेगाडी दररोज उशिरा येणे यामुळे प्रवाशांना उशिरा घरी पोहोचावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाला परिसरातील प्रवासी कंटाळून गेले आहेत. दिवसभरात वेळापत्रकानुसार रेल्वे कधीच वेळेवर धावत नाही. काही ना काही कारण रेल्वे विभागामार्फत दिले जाते. रेल्वे गाडी वेळेवर तर येणार नाही ना? या भीतीपोटी प्रवासी दररोज रेल्वेस्थानक वेळेत गाठत असतात. मात्र, रोज त्यांची निराशा होते. तासन् तास रेल्वेस्थानकावर ताटकळत राहावे लागते. दरम्यान, गोंदिया- बल्लारशाह, बल्लारशाह – गोंदिया ही पॅसेंजर रेल्वे गाडी वेळेत यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वरत्न रामटेके यांच्यासह प्रवाशांनी दिला आहे..