गावकऱ्यांनी केला प्राचार्याचा सेवानिवृत्ती पर सत्कार
दत्तोरावासियांचा स्त्युत्य उपक्रम
देवेंद्र रामटेके
गोंदिया-(ता.9)सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्याला गावकऱ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवून निरोप दिल्याचा कार्यक्रम रविवारी(ता.5)गोंदिया तालुक्यातील दत्तोरा येथील गावकऱ्यांनी घडवून आणला. या सत्कार समरंभातून गावकऱ्यांनी दिलेल्या अपार प्रेमापोटी सदर प्राचार्याचे मन गहिवरून आले.
दत्तोरा येथे मागच्या अनेक वर्षापासून श्री.जे.बी. कटरे हे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. आपल्या तेहत्तीस वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ते मागच्या आठवड्यात सेवनिवृत्त झाले.त्यांनी सुरुवातीच्या अवघड काळापासून आपल्या शिक्षकीपेशाला सुरुवात केली. अनेक हाल अपेष्टा सहन करीत त्यांनी विध्यार्थी घडवून आणले.त्यांच्या हातून अनेक मातब्बर विद्यार्थी घडून आले.त्यांचा केवळ विद्यार्थी घडविण्यावरच भर नव्हता तर त्यांनी पालकांनाही योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलुन आणला. विद्यार्थी विकास हाच एकमेव ध्यास त्यांना होता.त्यामुळे प्रा. कटरे हे नेहमीच गावकऱ्यांना आपुलकीचे झाले होते. कर्मभूमी असलेल्या या गावावर त्यांचे अपार प्रेम होते. शिक्षकी पेशा बाजूला ठेवून ते गावकऱ्यांच्या मदतीला वेळीअवेळी धावून जायचे.गावावर असलेल्या त्यांच्या या प्रेमापोटीच गावकऱ्यांनी सेवानिवृत्तीचा हा आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भव्य पूजेने करण्यात आली. त्यानंतर दहीकाला करून प्रा.कटरे यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शेवटी गावकऱ्यांना भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी सरपंच तथा जि. प. सदस्य सुरजलाल महारवाडे, भुमेश चौरे, इंद्रराज शिवणकर, मिताराम कोरे गुरुजी. डॉ. तुळशीरामजी शिवणकर, फुलचंद जांभुळकर, शामलाल मारबदे, भोजराज चुटे, देवराम ब्राह्मणकर, विजय ब्राह्मणकर, ब्रिजलाल महारवाडे, रामलाल चूटे तथा समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.