*विकसित भारत संकल्प यात्रा सभा*
वाशिम,दि.१७- केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. ज्या विविध योजनांचा लाभ अद्यापही ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही, त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्या योजनांचा लाभ घेण्यास त्या लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ” विकसित भारत संकल्पना यात्रा ” ही मोहीम राबविण्यात येत आहे.यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत मिशन मोडवर पोहोचविण्याचे काम यंत्रणांनी करावे. असे निर्देश केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालय विभागाचे संचालक रोशन थॉमस यांनी दिले.
आज १७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ” विकसित भारत संकल्प यात्रा ” मोहिमेच्या तयारीचा आढावा आयोजित सभेत घेताना श्री.थॉमस बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.थॉमस पुढे म्हणाले, जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघितले जाते.विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र सरकारचे कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष आहे.देशाच्या विकासात कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे.देशातील १४० कोटी लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज कृषी क्षेत्रातून पूर्ण होते.कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत.त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच अन्य घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना मिळावी.ही माहिती त्यांना मिळाल्यास शेतकरी तसेच संबंधित योजनांचे लाभार्थी योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित होतील.लाभातून त्यांच्या विकासाला चालना मिळून त्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळाल्याचे सांगून श्री.थॉमस पुढे म्हणाले की,यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.ही योजना उद्योग व्यवसाय सुरू करण्यास पाठबळ देत आहे.विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे.या यात्रेदरम्यान लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व्हावी,यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा.जेथे लाभार्थ्यांनी अद्यापही केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला नाही,त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवावी. संकल्प यात्रेदरम्यान केंद्र सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थी व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी युवा वर्ग,महिला बचत गट व विद्यार्थी यांना व्यापक प्रमाणात सहभागी करून घ्यावे.जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यात यावी.असे श्री.थॉमस यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,” विकसित भारत संकल्प यात्रा ” या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळाल्यास ते या योजनांचा लाभ घेण्यास पुढे येतील. योजनांचा लाभ मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.पी.एम.विश्वकर्मा योजना,पीएम आवास योजना व आयुष्यमान भारत या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही,याबाबतची दक्षता घेण्यात यावी.आगामी निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन आणि जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे मिशन मोडवर यंत्रणांनी विकसित भारत संकल्प यात्रेसाठी काम करावे. या यात्रेमुळे केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेबाबतची माहिती दिली.सभेला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिलीप मोहापात्रा,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.रणजित सरनाईक,कृषी उपसंचालक श्री.धनुडे तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.