स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची सूचना
गोंदिया, दि. १७ – जनावरांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडण्यामुळे विद्युत अपघात होणे व त्यामुळे काहीजणांचे जीव जाणे ही गंभीर बाब आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशी सूचना एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी गोंदिया येथे शुक्रवारी केली.
वीज कंपन्यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे आणि महाऊर्जाचे महाव्यवस्थापक वैभव पाथोडे यावेळी उपस्थित होते.
विश्वास पाठक म्हणाले की, जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपणात वीज सोडण्याच्या प्रकारामुळे अनेक अपघात झाले असून काहीजणांचा बळी गेला आहे. ही चिंताजनक बाब आहे. एकूणच विद्युत अपघात रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वांमध्ये जागृती करावी तसेच विविध शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करावे. घरोघरी विजेविषयी केले जाणारे काम हे परवानाधारक इलेक्ट्रिशिअनकडूनच करून घ्यावे.
गोंदिया जिल्ह्यात वीज अपघात होतात तेथे विद्युत निरीक्षक विभागाकडून स्थानिक लोकांमध्ये जनजागृती केली जाते याचे त्यांनी स्वागत केले. परवानाधारक इलेक्ट्रिशिअन्सना प्रशिक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.विश्वास पाठक यांनी सांगितले की, पूर, वादळ अशा आपत्तीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. याच पद्धतीने नेहेमी काम केले तर ग्राहकांच्या अपेक्षेनुसार दर्जेदार वीज पुरवठा करण्याच्या बाबतीत कोणीही महावितरणची बरोबरी करू शकणार नाही.
ग्राहकांची वाढती वीज मागणी ध्यानात घेऊन वीज वितरण यंत्रणा सुधारण्यासाठी मोदी सरकारच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यात ६९० कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रसाद रेशमे म्हणाले की, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यावर महावितरणचा भर आहे. नवीन वीज कनेक्शन देणे किंवा ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे या बाबतीत मुख्यालयातून काटेकोर देखरेख चालू आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. पुष्पा चव्हाण, सतीश अणे व वैभव पाथोडे यांनी संबंधित कंपन्यांच्या कामगिरीचे सादरीकरण केले.