अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0
13

गोंदिया,दि.29– जिल्ह्यात 1.90 लक्ष हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जात असून जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणावर कडधान्य, भाजीपाला, फळबाग व अन्य पिके घेतात.परंतु मागील दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावे,या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुुख्यमंत्र्याना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिले आहे.

या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी यासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत मुख्यमंत्री यांना जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या नेेतृत्वात जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, बाळकृष्ण पटले, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, निरज उपवशी, माधुरी नासरे, कुंदा दोनोडे, रुचिता चव्हाण, नरहरप्रसाद मस्करे, दिलीप डोंगरे, नितीन टेंभरे, शैलेश वासनिक, सुनील पटले, अर्जुन मेश्राम, प्रमोद कोसरकर या शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले.

अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान, भाजीपाला, फळबाग, मका व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. कापणीस आलेला धान, कापणी झालेल्या धानाचे कडपे, धान कापणी झाल्यानंतर पेरण्यात आलेले चना, गहू, मका, वटाणा, तूर व इतर कडधान्य यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच कापणी करुन शेतात तयार केलेली पुजने यांचे ही नुकसान झालेले आहे. या सर्वांचे पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ नुकसान भरपाईची करून मदत करावी अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.