जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद आपल्या गावी हे उपक्रम ठरणार माध्यम- जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

0
19

* सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे अभियानाचा शुभारंभ
* विविध विभागाच्या योजनांची स्टॉल्सच्या माध्यमातून केली जनजागृती
गोंदिया – जिल्हा परिषद म्हणजे ग्रामविकासाचे माध्यम आहे. ग्रामीण भागातील बहुतेक योजना ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद आपल्या गावी हे अभियान एक महत्वाचे माध्यम ठरणार, असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.
जिल्हा परिषद आपल्या गावी या उपक्रमाचे शुभारंभ कार्यक्रम सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे आज 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर, जि. प. समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, जि.प.सदस्य डॉ.भुमेश्र्वर पटले, जि. प. सदस्या कविता ताई रंगारी, जि. प. सदस्या सुधाताई रहांगडाले, जि.प. सदस्या चंद्रकला डोंगरवार, पं. स. उपसभापती शालिंदर कापगते, सरपंच योगेश्वरी चौधरी, पंचायत समिती सदस्य सर्वश्री डॉ. रुखिराम वाढई, प.स.सदस्य अल्लाउद्दीन राजानी, चेतन वडगाये, शिवाजी गहाने, जि.प. प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) गोविंद खामकर, गटविकास अधिकारी अजित पवार आदी उपस्थित होते. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित अतिथी यांचे पर्यावरण तसेच स्वच्छते विषयक जाणीव व्हावी म्हणून लहान झाड व एक झाडू देऊन स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून जनतेच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक कशी करायची यासाठी आपण प्रयत्नशील होतो. मात्र आता या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात आपण जिल्हा परिषदेच्या योजना पोहोचवून समस्या निराकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषद आपल्या गावी या उपक्रमा विषयक माहिती दिली. सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी गावातील अडीअडचणी वरिष्ठांच्या लक्षात आणून देत त्या सोडविण्याची मागणी केली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना लाभार्थ्यांनी स्वतः मागणी करून त्याची अंमलबजावणी केली तर कोणतीही योजना निश्चितच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगत नागरिकांनी वेळेवर कराचा भरणा करावा, असे आवाहन केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर यांनी जिल्हा परिषद आपल्या गावी हे उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. यावेळी समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, प. स. सभापती संगीता ताई खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भूमेश्वर पटले, यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले. सुरुवातीला विकसित भारत संकल्प यात्रेला भेट देण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण विभाग, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, कृषी विभाग, पशू संवर्धन विभाग, घरकुल विभाग, उमेद अभियान, जिल्हा समाजकल्याण विभाग, समग्र शिक्षा अभियान, सेतू केंद्र, आधार नूतनीकरण, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग देवरी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने स्टॉल्स लावण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालकल्याण विभाग सडक अर्जुनीच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत काव्या सुरेश मरस्कोल्हे, अश्विनी सुरेश मरस्कोल्हे, अन्वी धर्मेंद्र अंबुले, हिरण्या नरेंद्र मेंढे, यशश्री हुपेंद्र खोटेले, दर्शिका दुर्गेश कुरसुंगे, छनक ओमराज डोये, नायरा विजय उदापुरे, दीक्षा विजय उदापुरे, काव्या दुर्योधन नेवारे, नित्या गणराज रहांगडाले, जान्वी संजय देशमुख, वृषाली प्रशांत मेंढे, रिया प्रशांत मेंढे यांना उपस्थितांच्या हस्ते मुदत ठेव धनादेश वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद गोंदियाचे सर्व विभाग प्रमुख तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक मुनेश्वर व अतुल गजभिये यांनी तर आभारप्रदर्शन गटविकास अधिकारी अजित पवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, पंचायत विभागाचे पंकज पटेल, पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद्र रहांगडाले यांच्यासह ग्रामपंचायत डव्वा येथील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.