मतदार याद्या अचुक करण्यावर व नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा – विजयलक्ष्मी बिदरी

0
10

गोंदिया, दि.4 : आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचुक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने दूरदृष्य प्रमाणीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्रीमती बिदरी बोलत होत्या. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

        विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी म्हणाल्या, आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक तयारी करायची आहे. भारत निवडणूक आयोगाने यापुर्वीच याबाबत सर्व तयारी सुरु केली आहे. आयोगाने सर्व मतदार संघातील कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांची तयारी, संवेदनशील मतदान केंद्र निश्चिती आदींचा यापुर्वीच आढावा घेतलेला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने, प्रशासनाने आयोगाच्या सूचनांचे बारकाईने अवलोकन करावे.

        मतदान यंत्रणेसाठी आवश्यक सर्व साधन सामग्रीचे व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन आदींसाठी सक्षम अधिकारी, मनुष्यबळ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमावे. निवडणूक यंत्रणेवर दोषारोप होऊ नयेत यासाठी अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. त्यासाठी मतदार यादी अचुक, निर्दोष असेल याकडे सर्वाधिक लक्ष द्यावे असे श्रीमती बिदरी म्हणाल्या.

       मतदार यादी निर्दोष करण्यासाठी मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, दुबार मतदार वगळणी याला सर्वाधिक भर द्यावा. मतदार यादीची योग्य पडताळणी करुन मयत मतदारांची वगळणी, मतदार यादीमध्ये अस्पष्ट छायाचित्रे असलेले मतदार याची दुरुस्ती करायची आहे. नवीन मतदारांचा समावेश करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अचुक राबवावा. ही सर्व कार्यवाही विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन करावी, असे केल्यास निश्चितपणे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल असे त्यांनी सांगितले.

       संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत गावपातळीवर पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांची भागनिहाय याद्या तपासणीसाठी मदत घ्यावी. 18 वर्षावरील कोणताही नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. युवा मतदार नोंदणीसाठी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधून मदत घ्यावी. मतदार निवडणूक ओळखपत्र आधार कार्डाशी जोडण्यावर भर देण्यात यावा. मतदान केंद्र असलेल्या शासकीय शाळा व इतर इमारतींची दुरुस्ती असल्यास त्याचे नियोजन आतापासूनच करा. फॉर्म नं.6, 7 व 8 मधील नागरिकांचे दावे व हरकती प्रलंबित ठेवू नका असे त्यांनी यावेळी सांगितले.

        गोंदिया जिल्ह्यात 63-अर्जुनी मोरगांव, 64-तिरोडा, 65-गोंदिया, 66-आमगाव (ST) असे चार विधानसभा मतदारसंघ असून मतदान केंद्राची संख्या एकूण 1284 आहे. एकूण चार विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार- 5,45,902. स्त्री मतदार- 5,50,548 व इतर- 09, असे एकूण 10,96,459 मतदार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारे 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून पताळणी करण्यात आली असून एकूण चार विधानसभा मतदारसंघात मृत मतदार- 26,254, स्थलांतरीत- 20,463, दुबार- 1,299, असे एकूण 48,016 मतदार वगळण्याची प्रक्रिया सुरु असून जिल्ह्यातील आधार क्रमांक जोडणी झालेल्या मतदारांची संख्या 6,85,980 आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी यावेळी दिली.