पर्यटनाला चालना देण्यासाठी चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
3

चंद्रपूर, दि. 06: विदर्भ ही वाघांची भूमी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत घेण्यात येईल. यामुळे पर्यटनाला चालना मिळून परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास मदत होईल. यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबल प्रमुख शैलेंद्र टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वन विकास महामंडळाचे सीजीएम संजीव कुमार, प्रशांत झुरमुरे, कल्याण कुमार आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनीजवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प होण्यासाठी असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा. अशा प्रकल्पातून संशोधन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र याठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहिती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा, अशा सूचना यावेळी दिल्या.