आयुष्मान भारत योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – डॉ.ओमप्रकाश शेटे

0
13

आयुष्यमान भारत योजनेचा आढावा

      गोंदिया, दि.19 : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा शासनातर्फे मोफत काढण्यात येत असून 1356 विविध आजारांवर मोफत औषधोपचार व शस्त्रक्रियेचा खर्च करण्याची तरतूद या योजनेत आहे. त्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत दोन्ही योजनेचा लाभ मिळण्याकरीता सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे केल्या.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा जियोजन समिती सभागृहात आयोजित आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेतांना डॉ.शेटे बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

        डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी हे सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेच्या वंचित व व्यावसायिक निकषानुसार ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुटूंबातील आहेत. गावपातळीवर ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड मोफत बनविण्यात येत आहेत. गावपातळीवर आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यत सदर योजनेची व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        सद्यस्थितीत गावपातळीवर महिलांमध्ये आजारांबाबत अनेक गैरसमजुती आहेत. अजानतेपणामुळे आजार शेवटच्या स्तरावर पोहोचल्यानंतर भरती  व उपचार करणे अवघड होते. त्यानंतरचा औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च अवाजवी दराने खाजगी दवाखान्यांमध्ये आकारला जातो. सदर खर्च गोरगरीबांना परवडणारा नसल्यामुळे खाजगी रुग्णालयांनी सामाजिक दायित्व या नात्याने औषधोपचाराचा खर्च या योजनेतून करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

        गोंदिया जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेत सरकारी दवाखान्यासह एकूण 11 हॉस्पिटल अंगीकृत आहेत. यामध्ये 6 शासकीय दवाखाने असून 5 खाजगी हॉस्पीटल्स आहेत. त्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव, ग्रामीण रुग्णालय देवरी, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी तसेच खाजगी रुग्णालयामध्ये बालाजी नर्सिंग होम, ब्राम्हणकर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, गोंदिया केअर हॉस्पीटल, न्यु गोंदिया हॉस्पीटल, रिलायन्स हॉस्पीटल यांचा यात समावेश आहे. तरी अंगीकृत खाजगी रुग्णालयांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून अवाजवी खर्च घेवू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

       आयुष्यमान भारत योजनेचे जिल्ह्यात 10 लाख 74 हजार 179 लाभार्थी असून 3 लाख 2 हजार 68 लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड बनविले आहे. तरी उर्वरित 7 लाख 72 हजार 211 लाभार्थ्यांना कार्ड बनविण्याकरीता ग्रामपंचायत व रेशन दुकानदार यांनी पुढाकार घेवून जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रोत्साहित करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

       यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधा बाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. आरोग्य सेवेत प्रत्यक्ष काम करतांना येणाऱ्या अडचणींचे/समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे त्यांनी यावेळी आश्वासीत केले. आयुष्मान भारत योजनेमधील तांत्रिक त्रुटी दूर करून लवकरच सदर योजना नव्या सुधारणासह येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        सभेला माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जायसवाल, आयुष्यमान भारत योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ.जयंती पटले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, गट विकास अधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.