‘हिट ॲण्ड रन’कायद्याला वाहन चालकांचा विरोध,गोंदियात आंदोलन

0
31

गोंदिया- ‘हिट ॲण्ड रन’ च्या संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला विरोध म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी गोंदियासह देशभरात रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.गोंदियातील जयस्तंभ चौकात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ट्रक्सी,आॅटो,ट्रक्टर व ट्रक यांची वाहतूक बंद पडली आहे.या वाहनचालकांनी मोटारसायकल रॅली काढून या कायद्याचा निषेध नोंदवत चौकाचौकात आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.तसेच बालाघाट मार्गावर टायर जाळून निषेध नोंदवला.अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन सुरू केले आहे.नव्या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर लोक ट्रक चालकाला मारहाण करतात म्हणून ट्रकचालक पळून जातात. मात्र नंतर ते पोलिसांपर्यंत जाऊन माहिती देतात असे एक चालकाने सांगितले.