अर्जूनी मोरPसिद्धीसाठी संकल्प करणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या क्षमता ओळखून नियोजन पद्धतीने प्रयत्न करत राहिल्यास आपोआपच आत्मविश्वास वाढतो व सिद्धीचे शिखर सहज काढता येते. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी व्यक्त केले.
ते जयदुर्गा ज्युनिअर कॉलेज गौरनगर द्वारा मांडोखाल/ टोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.दिनांक सात जानेवारीपासून सुरू झालेल्या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन अर्जुनी मोर चे नगरसेवक दानेश साखरे यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी गावच्या सरपंच हेमलता राऊत ,उपसरपंच मुरारी घोडेस्वार,ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल पुस्तोडे, पालिकाताई घोडेस्वार, ग्राम सेवक डी. बी पारधी, टीकाराम पाटील नाकाडे, राजू चौहान, सत्यवान लांजेवार इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी दानेश साखरे यांनी महापुरुषांचे दाखले देवून त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. व संस्था व शाळेच्या उपक्रमाची प्रशंसा केली .सुरवातीला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघदीप कांबळे यांनी रा. से. यो. शिबिर आयोजनातील भूमिका विषद केली व शिबिरामध्ये सात दिवस आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा लेखाजोगा सादर केला .
कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्राम पंचायत मांडोखल व विद्यालयाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे , दानेश साखरे व संस्था अध्यक्ष अशोक चांडक यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी भुवेंद्र चौहान यांनी केले तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ममता लंजे यांनी मान्यवरांचे आभार मानले.