‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून शासकीय योजना घरोघरी

0
6

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

     गोंदिया, दि.9  : केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

        जिल्ह्यात विविध ठिकाणी चित्ररथ नेण्यात येत आहेत. या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. यात अलिकडेच आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सितेपार, बुरडीटोला, बंजारीटोला, नंगपुरा. देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत चिलाटी, चिपोटा, इस्तारी, ककोडी. गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत नंगपुरा (मुर्री), पांजरा, चुटिया, रापेवाडा. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत घाटबोरी (को.), घाटबोरी (ते.), बौध्दनगर, बोपाबोडी या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ नेण्यात आला. यास नागरिकांनी विविध योजनांची माहिती प्राप्त करुन घेतली.

        जिल्ह्यात सदर मोहिमेची सुरुवात दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पासून झाली असून ही मोहिम 25 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 547 ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

        विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.