Home विदर्भ वीज ग्राहकांची ‘ऑनलाईन’ भरारी

वीज ग्राहकांची ‘ऑनलाईन’ भरारी

0

नागपूर दि. 10 जानेवारी 2024:- वीज ग्राहकांना सदैवच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महावितरणने लघु व उच्च दाब ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आधुनिक सुविधांचा वापर करीत 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षभराच्या काळात महावितरणच्या नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांनी तब्बल 60.24 टक्के रकमेचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे 2022 च्या तुलनेत हा आकडा सुमारे 8 टक्क्यांनी अधिक आहे.

2023 या संपुर्ण वर्षभरात नागपूर परिमंडलातील लघुदाब ग्राहकांनी एकत्रित 86 लाख 62 हजार 440 ऑनलाईन व्यवहारासह तब्बल 2 हजार 127 कोटींपेक्षा अधिकच्या वीजबिलांचा भरणा घरबसल्या आणि सुरक्षितपणे केला आहे, मागिल वर्षी 77 लाख 63 हजार 730 व्यवहराच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 658 कोटींपेक्षा अधिकच्या वीजबिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केला होता.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व “महावितरण मोबाईल ॲप” उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त रु. 5000 पेक्षा जास्त वीज बिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने आरटीजीएस/एनईएफटी द्वारे वीज बिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो तपशील ग्राहक वर्गवारीनुसार वीज बिलावर देखील छापण्यात आलेला आहे.

महावितरणचे उच्च दाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत असून  महावितरणच्या  लघुदाब ग्राहकांनी तब्बल 60.24 टक्के रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये नागपूर शहर मंडलातील ग्राहकांनी 55 लाख 23 हजार 858 ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून सर्वाधिक 1 हजार 500 कोटींपेक्षा अधिकचा वीजबिल भरणा केला आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण मंडलातील ग्राहकांनी 17 लाख 25 हजार 236 व्यवहारांच्या माध्यमातून  379 कोटीपेक्षा अधिक तर वर्धा मंडलातील  ग्राहकांनी 14 लाख 13 हजार 346 ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमांतून 247 कोटीपेक्षा अधिक च्या वीजबिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केला आहे.

‘ऑनलाइन’ वीज बिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास 1 टक्का असे एकूण 1.25 टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवरवीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस भारतीय रिझर्व बँकेचे पेमेंट व सेटलमेंट कायदा 2007 च्या तरतुदी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्याचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version