महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नि:शुल्क महाआरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबीर

0
16

गोंदिया, दि.10 : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त समादेशक अमोल गायकवाड भारत राखीव बटालियन क्रमांक 2, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 गोंदिया यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये हर्ष फायर, शाळकरी मुलांकरिता शस्त्र प्रदर्शनी, बँड डिस्प्ले,  महाराष्ट्र पोलीस दलाचे कामकाज व कार्यपद्धती याबद्दल जनसामान्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. गटाचे समादेशक सहायक प्रमोद लोखंडे तसेच सहायक समादेशक कैलाश पुसाम, मंगेश शेलोटकर, के. बी. सिंह यांनी गटा शेजारील शाळा-महाविद्यालय येथे भेटी देऊन राज्य राखीव पोलीस दलाचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.

         कमांडंट यांचे संकप्लनेतून 8 जानेवारी 2024 रोजी जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर, शालिनीताई मेघे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तथा रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  ज्यामध्ये गटातील पोलीस अधिकारी अमलदार त्यांचे  कुटुंबीय त्यासोबतच गटाशेजारील जवळपास आठ ते दहा गावातील ग्रामस्थांचे नि:शुल्क रोगनिदान व तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, दंतचिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ व इतर अनेक विभागाचे वैद्यकीय अधिकारी त्यांचे टीमसह उपस्थित होते.

        यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून गटातील पोलीस अधिकारी अमलदार तथा शेजारील ग्रामस्थ अशा एकूण 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले. गटाशेजारील अतिशय गरीब गरजू ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. सोबतच शासकीय आश्रम शाळेतील मुले यांची सुद्धा संपूर्ण तपासणी करून त्यांना नि:शुल्क औषधी वितरण करण्यात आले. ज्या रुग्णांना पुढील तपासण्या व अधिक उपचाराची गरज आहे अशा एकूण 64 रुग्णांना नागपूर येथील सुसज्ज अशा शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये औषध उपचाराकरीता नि:शुल्क जाणे-येणे, निवास व भोजन व्यवस्था जीवन आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे करण्यात आली आहे. या शिबिरांतर्गत 23 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून याकरिता रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर हे मदत करणार आहेत. शिबिरामध्ये एकूण 451 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. वय वर्ष 40 च्या वर असणाऱ्या सर्वांची ईसीजी, ब्लड शुगर व बीपी तपासणी करण्यात आली. याकरिता जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर चे संस्थापक अध्यक्ष जीवनभाऊ जवंजाळ, शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर चे प्रशासकीय अधिकारी डॉ. आश्विन रडके, रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर चे अध्यक्ष राजीव वरभे, रोशन दारोकर जिल्हा अध्यक्ष, सुयोग गोरले सचिव जीवन आधार यांची मोलाची साथ मिळाली. ज्यामुळे अतिशय भव्य अशा महाआरोग्य शिबिराचे आयोजन शक्य झाले. शिबिरामध्ये तपासणीकरिता आलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

          सूत्रसंचालन आरोग्य शिबीर समन्वयक व पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस निरीक्षक डी. जी. उमलवाडकर, कोलवते, सोनटक्के, धनकर, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, समर यादव, नरेंद्र परीहार, प्रशांत नारखेडे, जगधने तथा गटातील संपूर्ण अधिकारी, अमलदार यांनी परिश्रम घेतले. आलेल्या वैद्यकीय चमुची निवास व्यवस्था आणि शिबीर आयोजनात पोलीस निरीक्षक मुख्यालय पवन मिश्रा तसेच पोलीस कल्याण अधिकारी सचिन चरडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. बटालियन तर्फे खेड्या-पाड्यातील गरजु लोकांना शिबिरापर्यंत ने-आण करण्याकरीता निःशुल्क वाहन व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामुळे महिला, बालक विशेषतः वृध्द रूग्णांना खुप आधार झाला.