* जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन
* 17 जानेवारी पर्यंत चालणार महोत्सव
* 225 स्टॉलवर मिळत आहे माहिती
* विविध विषयांवर चर्चा व परिसंवाद
* जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
गोंदिया, दि.13 : भारत हा कृषि प्रधान देश आहे. सद्याच्या परिस्थितीत वातावरणीय बदलामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी दुष्काळ अशी सद्या परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन आपले जीवनमान उंचवावे, असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आज येथे केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदान, गोंदिया येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना श्री. चंद्रिकापुरे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते करण्यात आले. आमदार विनोद अग्रवाल, जि.प.बांधकाम व अर्थ समिती सभापती संजय टेंभरे, समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, पं.स.सभापती मुनेश्वर रहांगडाले, उपवनसंरक्षक श्री. बोंबार्डे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक (आत्मा) अजित आडसुळे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, कृषि विज्ञान केंद्र हिवरा चे प्रमुख सय्यद शाकीर अली यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
आमदार श्री. चंद्रिकापुरे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात मुख्यत्वे धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी शेती करीत असतांना पारंपारिक शेतीला फाटा देत इतरही शेतीपुरक पिके घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समृध्द कसे होतील याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष दयावे. उत्पन्न घेतांना कोणत्या पध्दतीने शेती करुन जास्तीत जास्त नफा मिळेल याबद्दल कृषि विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्योजकाकडे वळावे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करुन दयावी, जेणेकरुन शेतकरी सुजलाम् सुफलाम् होईल यावर भर देण्यात यावा. महिला बचत गटाला माविम व उमेदने कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दयावे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचवावे. जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्प देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. देशात 50 टक्के नागरिक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावे. इजराईल देशात जशी शेती केली जाते, तशी शेती आपल्या देशातील शेतकऱ्यांनी केली तर भारतातील शेतकरी सुखी व समृध्द होतील. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी, यासाठी शेतकऱ्यांनी समयसुचकता पाळावी. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले आर्थिक स्त्रोत उंचवावे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीच नाही. महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले, गोंदिया जिल्ह्याची संपुर्ण महाराष्ट्रात राईस सीटी म्हणून ओळख आहे. तसेच जिल्ह्याची धानाचे कोठार म्हणून सुध्दा ओळख आहे. शेतकऱ्यांनी केवळ धानाच्या उत्पादनावर भर न देता शेतीपुरक तृणधान्याचे पीक सुध्दा घेण्यात यावे. शेतीला जोडधंदयाची उत्पादने जसे- मशरुम, हळद पीक घेण्यात यावी. परिसंवाद चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत यावर कृषि विभागाने भर दयावा. शेतीला दुग्ध उत्पादनाची जोड देण्यात यावी. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल यावर कृषि विभागाने विशेष भर दयावे. धान पिकाला फाटा देत तेल बियाणांचेही उत्पादन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जि.प.बांधकाम व अर्थ समिती सभापती संजय टेंभरे, समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (आत्मा) अजित आडसुळे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कृषी व तृणधान्य महोत्सवाच्या आयोजनाची माहिती विशद केले. दिनांक 13 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन ‘मोदी मैदान’ टी पाईट जवळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे करण्यात आले आहे. सदर ठिकाणी विविध प्रकारचे 225 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. कृषी महोत्सव शेतकरी, कृषी अभ्यासक व नागरिकांसाठी पर्वणी असून महोत्सवाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत असणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी सालेकसा नंदु वानखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी उपसंचालक धनराज तुमडाम यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बचत गट निर्मित वस्तूंचे स्टॉल
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गट निर्मित वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. विविध वस्तू व धान्याची या स्टॉलवर प्रदर्शन व विक्री होत आहे. तसेच शेती उपयोगी साहित्य सुद्धा याठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नागरिकांसाठी खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. या ठिकाणी येऊन खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.