धानावरची निर्भरता कमी करण्यासाठी भेंडी उत्पादन उत्तम पर्याय

0
23

भेंडी -उत्तम कृषी उत्पादन पद्धती” या विषयावर परिसंवाद

जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सव

       गोंदिया, दि.14 : गोंदिया येथे सुरू असलेल्या पाच दिवसीय जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवात “भेंडी -उत्तम कृषी उत्पादन पद्धती” या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील धानावरची निर्भरता कमी करायची असेल तर शेतकऱ्यांनी पीक विविधिकरणावर भर दिला पाहिजे आणि त्यासाठी भेंडी उत्पादन हा उत्तम पर्याय ठरू शकतो असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

        हेमंत जगताप प्रशिक्षण अधिकारी यांनी भारतातील व महाराष्ट्रातील भेंडी लागवडीची सद्यस्थिती, भेंडी लागवडीसाठी जमीन व हवामान, भेंडीच्या उपयुक्त जाती, भेंडी लागवड करताना आवश्यक मुद्दे, भेंडी लागवडीमधील खत व पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

       राजेश चव्हाण यांनी भेंडीवरील विविध किडी व त्यांचे प्रकार व व्यवस्थापन, विविध रोग व त्यांचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रुपेश माने यांनी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राबवणारे विविध घटक, त्याविषयी आवश्यक पात्रता व शासकीय अनुदान तसेच भेंडी लागवड केल्यानंतर भेंडीची काढणी झाल्यानंतर काढणी पश्चात व्यवस्थापनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

       सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहायीत महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया, कृषी विभाग गोंदिया व आत्मा विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भेंडी -उत्तम कृषी उत्पादन पद्धती” विषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी महोत्सवात करण्यात आले.

       यावेळी डॉ. सय्यद शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र हिवरा, डॉ. विजयकुमार कोरे विषय तज्ञ उद्यानविद्या, राजेश कुमार चव्हाण विषय तज्ञ कीटक शास्त्रज्ञ, हेमंत जगताप प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे, रुपेश माने कृषी व्यवसाय तज्ञ मॅग्नेट नागपूर, सुमित कांबळे कन्सल्टंट मॅग्नेट नागपूर व ओमप्रकाश सुखदेवे (लैंगिक समानता व सामाजिक समावेशन अधिकारी) मॅग्नेट प्रकल्प उपस्थित होते.

       डॉ. सय्यद अली यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त भेंडी उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भेंडी उत्पादन करण्यासाठी व निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मदत कृषी विज्ञान केंद्राकडून केली जाईल असे आश्वासित  केले. शासनाकडून भविष्यामध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये  राबवावेत असे आवाहन त्यांनी  केले.

       हेमंत जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उद्यान विद्या विभागातील १५ पिकांची अशा प्रकारची प्रशिक्षणे राज्यांमध्ये विविध भागांमध्ये राबवली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज भेंडी पिकाविषयी गोंदिया जिल्ह्यातील  शेतकऱ्यांसाठी उत्तम कृषी पद्धती याविषयी कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अशाप्रकारचे जास्तीत जास्त कार्यक्रम जिल्ह्यामध्ये  घेतले जातील असे आश्वासित केले.

       भेंडी लागवड ग्लोबल गॅप प्रमाणिकरण व निर्यात व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती डॉ. सय्यद अली यांनी दिली. हेमंत जगताप यांनी भेंडी लागवडीपासून ते काढणीपर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले.

       राजेश चव्हाण यांनी भेंडी पीक कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. रुपेश माने मास्टर ट्रेनर मॅग्नेट यांनी मॅग्नेट प्रकल्प व भेंडी काढणी पश्चात व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. ओम प्रकाश सुखदेवे यांनी महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान तसेच लैंगिक समानता व सामाजिक समावेशन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 200 हून अधिक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये गोंदिया जिल्ह्यातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. विजयकुमार कोरे यांनी मानले.