बँक खात्यातून बळजबरी पैसे काढल्याचा तक्रारदाराचा आरोप
भंडारा : न्याय प्रविष्ट असलेल्या एका कौटुंबिक वादाच्या प्रकरणातील तक्रारदार जितेंद्र आग्रोया यांना तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप आग्रोया यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. १० जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याचे सांगत या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या बँक खात्यातून बळजबरी पैसे काढल्याचा गंभीर आरोपही जितेंद्र आग्रोया यांनी यावेळी केला. संबधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आग्रोया यांनी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केली असल्याचे सांगितले.
आग्रोया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कौंटुबिक वादाचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणासंबंधी आग्रोया यांना उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांनी १० जानेवारीला कार्यालयात बोलावून घेतले आणि काहीही न विचारता शिवीगाळ करत बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. आग्रोया यांचा मोबाईल फोन हिसकावून बँकिंग ऍप्स पासवर्ड विचारण्यात आले. त्यांचा मोबाईलवरून मुलीला कॉल करून त्यांच्या तिची माफी माग असे सांगण्यात आले. मुलीची माफी मागितली नाही तर तुला कोणत्याही प्रकारणात फसवू आणि तुला मुख्यमंत्री सुद्धा वाचवणार नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांनी धमकी दिल्याचे जितेंद्र यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर त्यांना धक्के मारत कार्यालयांच्या बाहेर काढण्यात आले. नंतर आग्रोया यांनी आपल्या भावाला फोन करून सर्व आपबिती सांगितली त्याच्या भावाने त्याला दवाखान्यात नेले व उपचार केला या प्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात धाव घेतली व सर्व प्रकार सांगितला त्याचे स्टेटमेंट पोलिसांनी घेतले असल्याचे आग्रोया यांनी सांगितले.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आग्रोया यांचा मोबाईल हिसकावून व पासवर्ड विचारून तक्रारदाराच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून सात हजार सातशे रूपये व युनियन बँक खात्यातुन डेबिट झाल्याचा गंभीर आरोपही आग्रोया यांनी केला आहे. तक्रारदारांनी पोलीस अधिक्षक यांना लेखी तक्रार करत व संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत तक्रारदाराचे भाऊ धर्मेंद्र आग्रोया, मुलगा ओम आग्रोया, निरंजन प्रजापती, भुपेंद्र लांजेवार, प्रमोद तितिरमारे, आदी उपस्थित होते.
संबंधितानी लावलेले सर्व आरोप खोटे आहे. संबंधिताच्या मुलीने मला फोनद्वारे संपर्क करून तिच्या वडिलाने तिचे इन्स्ट्राग्राम फेक प्रोफाइल तयार केल्याची तक्रार केली होती. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. -रश्मीता राव, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर