नागरिकांनी रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी व्हावे-डॉ.हरीष बाहेती

0
5
*35 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन*
वाशिम,दि.16- सुरक्षितता हा जीवनाचा एक मार्ग आहे.रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी,या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.
रस्ता सुरक्षा अभियान एक महिन्याकरीता मर्यादित न ठेवता वर्षभर प्रत्येक कार्यालयाकडून, प्रत्येक नागरिकांकडून व वाहन चालकांकडून राबवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.हरीष बाहेती यांनी केले.
       उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्यावतीने 35 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती समरिन सय्यद,मोटार वाहन निरीक्षक दिनेश सुरडकर व सुजय पगार यांची उपस्थिती होती.
       रस्ता सुरक्षा अभियानात संपूर्ण महिनाभरात विशेष तपासणी मोहिमा योग्यता प्रमाणपत्र,विमा प्रमाणपत्र व पी.यू.सी.तपासणी करणे. ओव्हरलोड/रिफ्लेक्टर तपासणी, सिटबेल्ट,हेल्मेट,टेललाईट / हेडलाईट इत्यादी तपासणी करण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती व्हावी याकरीता चौका-चौकात भिंतीपत्रके वाटप,चौक सभा, पथनाटय प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच नेत्र तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर, अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येणार आहेत.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा नियमांच्या पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले.
       प्रास्ताविकातून श्रीमती सय्यद यांनी नागरिकांना हेल्मेट वापरणे, सिट बेल्ट वापरणे,वाहनाचा वेग मर्यादीत ठेवणे व सर्व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.श्री जयस्वाल यांनी वाहन चालकांना मद्यपान करून वाहन न चालविणे व ट्रिपलसिट वाहने न चालविण्याचे आवाहन यावेळी केले.
         कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ लिपीक श्याम बढेल यांनी तर उपस्थितांचे आभार सहायक मोटार वाहन निरीक्षक सतिश इंगळे यांनी मानले.कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी,चालक प्रशिक्षण वाहन संस्था,वाहतूकदार संघटना तसेच नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.