ताडगाव येथे स्व. खा. जतिराम बर्वे पुण्यतिथी महोत्सव साजरा
अर्जुनी मोर. – इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांचे विचार सर्वाना प्रेरणादायीच असतात संत महापुरुषांच्या त्यागाने प्रत्येक मानवाला सोनेरी दिवस आले. तरीही आपला मागासवर्गीय समाज आजही मागासलेला आहे. याचे कारण आपण जयंती पुण्यतिथी करतो परंतु त्यांचे विचार कधी वाचतच नाही. जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत महापुरुष आपल्याला समजणार नाही ,वर्गाचे बाहेर बसून शिकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात विद्वान ठरले भारताला अनमोल असे संविधान देऊन आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आपला समाज हा गरीब आहे. गरिबीला मात करायचे असेल तर शिक्षण काळाची गरज असून शिक्षणाचे माध्यमातूनच सुखाचा शोध घेतला पाहिजे. स्वर्गीय जातीराम बर्वे यांनी 1980 चे दशकात रामटेक लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवून विक्रमी मतांनी निवडून आले .भोई ढिवर कहार समाजा साठीच नव्हे तर अनेक गरीब वर्गासाठी मोलाचे असे कार्य केले म्हणून आपल्याला त्यांचे पुण्यस्मरण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. आणि म्हणून पुस्तकाचे वाचनच माणसाला सामर्थ्यवान बनविते असे मौलिक विचार आमदार मनोहरराव चंदिकापुरे यांनी व्यक्त केले.
पंचशील मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था व ढिवर समाज ताडगाव च्या वतीने (ता.16) स्व. मत्स्य सहकार महर्षी खासदार जतिराम बर्वे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून आमदार चंद्रिकापुरे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय केवट ,पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनदास गणवीर, डॉ. गजानन डोंगरवार ,सरपंच गणिताताई नाकाडे, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, उपसरपंच दशरथ शहारे, संस्थेचे अध्यक्ष शालीकराम शहारे, व अन्य संचालक ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील गणमान्य मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मत्स्य सहकार महर्षी खा. स्व. जतीराम बर्वे, ढिवर समाजाचे नेते स्व. घुसाजी मेश्राम, पंचशील मत्स्य सहकारी संस्थेचे माजी सचिव स्व. युवराज बावणे यांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या महान लोकांना आदरांजली वाहण्यात आली. तथा कोळीगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉक्टर गजानन डोंगरवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय केवट ,सोनदास गणवीर ,नूतन सोनवाणे ,सरपंच गणिता नाकाडे यांनीही समाज बांधवांना शिका संघटित व्हा संघर्ष करा या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलमंत्राचा अंगीकार करून ढिवर समाजाने आपली सामाजिक आर्थिक व शैक्षणिक प्रगती करण्याचे आवाहन केले. संचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश गहाणे तर प्रास्ताविक व आभार माजी उपसरपंच दामोदर शहारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष शालिक शहारे ,प्रभाकर कांबळे, संतोषीबाई बावणे, गुरुप्रकाश मेश्राम, नारायण शहारे, नरेंद्र मेश्राम, नरेश बावणे, महेश मेश्राम, पार्वताबाई शहारे, तुकाराम मेश्राम, वनिता भोपे, युवराज कोल्हे ,भूषण बावणे, प्रभू मेश्राम आदींनी विशेष परिश्रम घेतले.