: महाप्रज्ञा बुध्द विहारात ध्यान कक्ष व ई-लर्निंग सेटरचे उद्घाटन
तिरोडा, ता. 24: राजकीय नेत्यांनी परिस्थिती अधिकच बेकार करून टाकली. मनगटात जोर नसते. कुवत नसते. विचार नसतो. मग नेते लोकांच्या हातात झेंडे देतात. लोकही झेंडे घेवून एवढे फिदा होतात की विचारच सोडून देतात. हिंदू असेल तर भगवा; बौध्द असेल तर निळा; आणि मुस्लीम असेल तर हिरवा झेंडा घेतो. जातींच्या या स्पर्धेचा आता वीट आला असून हा देश बगर जातींचा कवा होईल, असा सवाल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ना. बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित केला. महाप्रज्ञा बुध्द विहार येथे रविवारी (ता. 21) नवनिर्मीत संबोधी ध्यान कक्ष आणि मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडून स्मृती ई-लर्निंग सेटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदासजी वैद्ये होते. मंचावर महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, प्रहारचे सपंर्क प्रमुख रमेश कारेमोरे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे उपाध्यक्ष टी.एम. वैद्ये, सचिव तेजराम मेश्राम, कोषाध्यक्ष आर.बी. नंदागवळी, सहसचिव पंचशिला रामटेके, सहकोषाध्यक्ष प्रदीपकुमार रंगारी, शशिकला मेश्राम उपस्थित होत्या. जातीव्यवस्थेवर प्रहार करतांना बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी चार वेळा आमदार झालो. निवडणूकीत मलाकुठल्या नेत्याची, जातीची आणि धर्माची गरज पडली नाही. ज्या दिवशी जात आणि धर्म सांगायची गरज पडल, त्यादिवशी निवडणूकच लढणार नाही. महात्मा फुले यांच्या विचारांचा दाखला देत, बच्चू कडू यांनी प्रशासनाला ‘कलमकसाई’ संबोधिले. ते म्हणाले, तुरीचे भाव वाढू नये, म्हणून केंद्र सरकारने एका महिन्यात तीन निर्णय घेतले. या निर्णयांमुळे बारा हजार रुपये क्विंटलची तूर सहा हजाराच्या दराने विकण्यास शेतकरी मजबूर झाला. कलमकसायांनी शेतकऱ्यांच्या छाताडावर तलवार चालवून टाकली. अशी कलम चालविल्यास लोकं मरतात. मात्र, बाबासाहेंबानी जनकल्याणासाठी कलम वापरली. छत्रपतींनी रयतेच्या हिताचे राज्य निर्माण केले. बाबासाहेंबानी राज्यघटना लिहीतांना छत्रपतींच्या स्वराज्य सुध्दा पुढे ठेवले होते. आम्ही महापुरुषांना जातीत बांधून ठेवले. हे महापुरुष जातीच्या बंधनातून कसे सुटतील, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. आपण बाबासाहेबाच्या विचारांचे खरे वंशज असून देशातील पहिलं दिव्यांग कल्याण मंत्रालय आमच्या लढयामुळे निर्माण झाल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले. आमचा जिल्हा मागासलेला आहे. मात्र, आपले कार्य वंचितांसाठी प्रकाशमान होणारे असून विहारातील उप्रक्रमांची माजी आमदार भजनदास वैद्ये यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्रसंशा केली. गेल्या वर्षभरापासून डॉ. बाबासाहेंब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेसाठी आम्ही शासन, प्रशासनाला मागणी करीत आहोत. मात्र, घटनेच्या शिल्पकारासाठी शासनाकडे जागा नसल्याची खंत व्यक्त करून महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये यांनी प्रास्ताविकातून विहार समितीच्या लोकोपयोगी कार्याची आणि विविध आंदोलनाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला बच्चूभाऊ कडू यांनी महाप्रज्ञा बुध्द विहार येथे वंदना करून मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू ई-लर्निंग सेटरचे तथा संबोधी ध्यान कक्षाचे लोकार्पण केले. याप्रंसगी माजी आमदार भजनदासजी वैद्ये, डॉ. आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष बी.व्ही. गोंडाणे, सेवानिवृत्त शिक्षक मोरेश्वर दहाटे, विहार समितीचे माजी सचिव के. के. वैद्ये, विचारमंचाचे संस्थापक प्रा. के. एफ. मेश्राम, प्रा. दिवाकर गेडाम, प्रा. व्ही.डी. मेश्राम, प्रभुदासजी गजभिये यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून तर प्रा. भास्कर गायकवाड, डॉ. आशिष बन्सोड, प्रवीण गेडाम, मनोज डोंगरे, महेंद्र भांडारकर, प्रा. एन.जी. मेश्राम, धमेंद्र मेश्राम, अरविंद मेश्राम, नितेश बन्सोड, मिनाक्षीताई दहिवले, निशांत बन्सोड, कल्पना बन्सोड, राजेश वासनिक, बबलदास रामटेके, राजश्री दहिवले, प्रकाश भालेराव, प्रल्हाद मेश्राम, सुक्शकला वैद्ये, भावनाताई हुमने, प्रविण नंदागवळी, रंजीत कानेकर यांचा समाजरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेले वैभव मनोज वासनिक, धर्मा गडपाल या यशस्वी युवकांचा देखील स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद ऊके यांनी केले. तर आभार टी.एम. वैद्ये यांनी मानले.
खाऱ्या पाण्याच्या तलावात गोड व्यवस्था
विहार, ध्यान कक्ष अणि वाचनालय पाहून मन मोहावून गेले. आपण विहारात उत्कृष्ट व्यवस्था केली. खाऱ्या पाण्याच्या तलावात गोड पाण्याची एक चांगली व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वाचनालयाला आईचे नाव देणे ही माझ्यासाठी लय गर्वाची गोष्ट असून बाबासाहेंबाच्या आणि गौतम बुध्दांच्या या परिसरामध्ये आमच्या आईचे नाव लागले, यासाठी आम्ही धन्य झालो. असल्याचे मत व्यक्त बच्चू कडू यांनी व्यक्त केले. दरम्यान वाचनालयासाठी एक लक्ष रुपये देण्याच्या घोषणेसह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या निर्मितीसाठी शासकीय जागेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.
——
‘चिकन अन् मटन, दाबा बटन’
निवडणूका आल्या की कुणी लड्डूची पंगत तर कुणी जलेबीची पंगत बसवते. कुणी किराणा वाटते. लोकशाहीचे हे आता शस्त्र आहेत. मत मिळवायचे शस्त्र काय, तर ‘चिकन मटन, दाबा बटन’. बाबासाहेंबानी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. त्याचे वाटोळे करू नका, अशी साद घालून कृतीवर भर घालण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले.