कोषागार विभाग शासकीय विभागाचा आर्थिक मार्गदर्शक- जनार्धन खोटरे

0
15

 कोषागार दिन साजरा

गोंदिया, दि. 02 :  कर रूपाने शासनाच्या तिजोरीत येणारा प्रत्येक पैसा योग्यरीत्या खर्च होतो की नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम शासनाच्या लेखा व कोषागारे विभागाचे आहे. शासनाच्या निधीचा विनियोग नियमानुसार होते की नाही ही बाब तपासण्याचे कार्य सुध्दा कोषागार कार्यालयाचे आहे. शासनाच्या विविध विभागांना आर्थिक व वित्तीय शिस्तीचे पालन व मार्गदर्शन करण्यासाठी लेखा व कोषागारे विभाग महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्धन खोटरे यांनी केले. जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित कोषागार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी चं. रा. आंबोळे हे होते. जनार्धन खोटरे यांनी दीप प्रज्वलन करून करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, लेखाधिकारी अनिता कोनाळे, चंद्रशेखर निसळे, लेखाधिकारी श्री. बोरकर, मंदार जोशी, सहाय्यक लेखाधिकारी प्रवीण मुंडले, सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक संजय शिंदे, ग्राहक मंचचे श्री. माटे व डेअरी व्यवस्थापक निनावे उपस्थित होते.

           शासन विविध विभागांना निधी वितरित करते. हा निधी लोककल्याणकारी योजना, वेतन, निवृत्तीवेतन, विविध विकासकामे यावर खर्च केला जातो. वितरित निधी शासकीय यंत्रणांनी नियमानुसार खर्च केला किंवा नाही ही बाब तपासण्याचे महत्वाचे काम कोषागार विभागाचे असते. यादृष्टीने कोषागार विभाग हा शासनाचा वित्तीय प्रहरी आहे असे जनार्धन खोटरे म्हणाले.

           कोषागार विभागाने गेल्या 62 वर्षात अनेक स्थित्यंतरे पाहले असून कालानुरूप अनेक आधुनिक बदल स्वीकारले आहेत. आधुनिकतेची कास धरत या विभागाने आर्थिक नियोजनासोबत वित्तीय शिस्त जोपासली असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी आंबोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. संपूर्ण संगणकीकृत झालेला कोषागार विभाग हा पहिला शासकीय विभाग असल्याचे त्यांनी सांगितले. लेखा व कोषागारे विभागाची वाटचाल पेपरलेस व्यवस्थेकडे सुरू असून येणाऱ्या काळात हा पेपरलेस झालेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषण झाली. लेखा व कोषागारे हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून जिल्ह्याला येणाऱ्यानिधीची योग्य विनियोग होतो की नाही ही बाब तपासण्याचे महत्वाचे काम कोषागारातून होत असते त्यामुळे कोषागार विभाग हा शासनाचा आर्थिक कणा असल्याचे मत सर्व पाहुण्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका चौधरी यांनी केले. प्रास्ताविक विश्वनाथ कापगते यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंजुषा ब्राम्हणकर यांनी मानले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी कोषागार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.