स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव स्वच्छतेचा संकल्प करा- विभागीय आयुक्त बिदरी

0
4

• संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण
* गोंदिया जिल्ह्यातील देवलगाव व नवेझरी ग्रामपंचायती विभागात तृतीय पुरस्काराने पुरस्कृत
गोंदिया-: स्वच्छतेमुळे आरोग्यमान उंचावते हा मुळ मंत्र घेऊन संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासोबत स्वच्छ करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजलक्ष्मी बिदरी यांनी केले.
यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारातर्गंत राज्य व विभागीय स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या पंचायत समितींना पुरस्कार देऊन विभागीय आयुक्तांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. वनामती येथील सभागृहात नागपूर विभागातील राज्य व विभागात उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती देवलगाव व नवेझरी यांना प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

यावेळी वनामतीच्या संचालक डॉ. मिताली सेठी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त विवेक इलमे, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुतर्ता करतांना स्वच्छ पिण्याचे पाणी आरोग्याच्या सुविधा पुरवितांना पंचायत राज अभियान व संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
नागपूर विभागातील राज्य व विभागीय स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या काटोल पंचायत समितीला एकुण 28 लक्ष रुपयाचा तर राज्यस्तरीय व विभागात उत्कृष्ट ठरलेल्या भंडारा पंचायत समिती एकुण 26 लक्ष रुपयाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यशवंत पंचायत राज अभियान (2020-21) व्दितीय पुरस्कार पं.स. पोभुर्णा चंद्रपूर, तर तृतीय पुरस्कार पं.स कामठी नागपूर यांना देण्यात आला. सन 2020-21 चा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार पंचायत समिती भंडारा यांना देण्यात आला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (2021-21) विभागस्तराव प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत खैरी (वलमाझरी) पं.स साकोली, व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत खापरी (केणे) पंचायत समिती नरखेड, तृतीय पुरस्कार संयुक्तपणे ग्रामपंचायत दिभना, पंचायत समिती गडचिरोली, ग्रापंचायत नवेझरी पंचायत समिती तिरोडा.
स्व.वंसतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत कोटंबा पंचायत समिती सेलू तर स्व.बाबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कार ग्रामपंचायत बेलगाव पंचायत समिती कुरखेडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत मंगी (बु) पंचायत समिती राजुरा यांना देण्यात आला.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (2019-20) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये विभागस्तरीय प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत येणिकोनी पंचायत समिती नरखेड, व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत सीतेपार पंचायत समिती मोहाडी, तृतीय पुरस्कार संयुक्तपणे ग्रामपंचायत देवलगाव पंचायत समिती अर्जुनी (मोर), ग्रामपंचायत कोसंगी पंचायत समिती मूल.
स्व.वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत अरततोंडी पंचायत समिती कुरखेडा, स्व.बाबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत खुर्सापार पंचायत समिती काटोल, डॉ.बाबसाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत बाजरवाडा पंचायत समिती आर्वी यांना देण्यात आला.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव तसेच तिरोडा तालुक्यातील नवेझरी ग्रामपंचायतींचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषद गोंदियाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी विलास निमजे, उपसभापती होमराज पुस्तोडे, जिल्हा समन्वयक भागचंद रहांगडाले, विस्तार अधिकारी राणे, सरपंच दिपाली कापगते, उपसरपंच तामदेव कापगते, ग्रामपंचायत सदस्य कालिदास पुस्तोडे, ग्रामसेवक धर्मराज लंजे, तिरोडाचे गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, माजी सरपंच महेंद्र भांडारकर, विस्तार अधिकारी व प्रशासक नेताजी धारगावे, ग्रामसेवक पंजाबराव चव्हाण, गट समन्वयक संजय राठोड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी केले तर संचालन दिनेश मासोदकर, आभार उपायुक्त विवेक इलमे यांनी मानले.