गोंदिया ग्रंथोत्सवाची ग्रंथदिंडीने थाटात सुरुवात

0
8

गोंदिया, दि.9 : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 8 व 9 फेब्रुवारी या कालावधीत गोंदिया ग्रंथोत्सव-2023 चे आयोजन श्री शारदा वाचनालय, गांधी प्रतिमेच्या बाजुला, नगर परिषद जवळ, गोंदिया येथे करण्यात आलेले आहे.

          सदर ग्रंथोत्सवाची सुरुवात 8 फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडीने करण्यात आली असून सकाळी 11 वाजता नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – नेहरु चौक – गोरेलाल चौक – गांधी प्रतिमा ते श्री शारदा वाचलनालय, नगर परिषद जवळ, गोंदिया येथे ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.

         ग्रंथदिंडी कार्यक्रमास अपर तहसिलदार विशाल सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, सचिव डी.डी.रहांगडाले, तांत्रिक निरीक्षक रत्नरक्षीत शेंडे, कनिष्ठ लिपीक अंकुश कटरे, सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, शालेय विद्याथी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी गोंदिया शहरातून प्रमाणबध्द लेझीमच्या तालात ग्रंथदिंडी दुमदमली. ग्रंथदिंडीत भारताचे संविधान, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. सदर ग्रंथदिंडीस श्री गुरुनानक ज्युनियर कॉलेज, श्री गुरुनानक हायस्कुल, श्री गुरुनानक प्रायमरी स्कुल, श्री गुरुनानक प्री प्रायमरी स्कुल गोंदिया येथील विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. श्री शारदा वाचनालय गोंदिया येथे शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे फुड किट व पिण्याच्या पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले.

        श्री शारदा वाचलनालय गोंदिया येथे आयोजित ग्रंथोत्सवात शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर, माय मराठी पुस्तकालय बल्लारशा, विराट पुस्तकालय हरिद्वार, सकाळ पुस्तकालय नागपूर यांचे पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. सदर ग्रंथोत्सवात परिसंवाद, कवी संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या उपक्रमांचा समावेश आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात उपस्थित राहून या ग्रंथोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आयोजन समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.