. 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कचारगड यात्रेचे आयोजन

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

कचारगड यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

गोंदिया, दि.13 : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ‘कचारगड’ हे आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असून भाविक दरवर्षी मोठ्या श्रध्देने लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असतात. या यात्रेसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आढावा घेतला व संबंधित विभागाला नेमून दिलेली कामे सुव्यवस्थित करण्याबाबत निर्देश दिले.

          अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कचारगड यात्रा समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे याचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेचे आयोजन दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा. पार्कींगची व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. व्हीआयपी मान्यवरांच्या आगमनाप्रसंगी हेलिपॅडची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात बॅरिकेटींग लावण्यात यावे तसेच परिसरातील रस्त्याच्या खड्डयांची डागडूजी करावी. विद्युत महामंडळाने वीज पुरवठा अखंडीत सुरु राहील याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन टीसीएल क्लोरीनेशन करावे. आरोग्य विभागाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. यात्रेत दुकाने लावतांना 20 फुटाचे अंतर ठेवून दोन्ही बाजुला दुकाने लावण्यात यावे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्नीशमनची व्यवस्था करावी. एसटी महामंडळाने भाविकांसाठी पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान नगरपरिषदेने मोबाईल शौचालयाची व्यवस्था करावी व शौचालय वापरण्यायोग्य असायला पाहिजे याची दक्षता घ्यावी. भाविकांनी पॉलिथिनचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा. यात्रेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. या दरम्यान 5 दिवसाच्या मोबाईल नेटवर्कसाठी कचारगड यात्रा समितीने जागा उपलब्ध करुन द्यावी. भाविकांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावे. स्तनपान करण्यासाठी महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात यावा. भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. ज्या ठिकाणी गॅस सिलेंडर्स वापरण्यात येतात तिथे फायर एस्टिंग्वीशर्स उपलब्ध ठेवण्यात यावे. यात्रेस्थळी मोबाईल नेटवर्क कार्यरत राहत नसल्याने एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वॉकी-टॉकी आणि पी.ए. सिस्टीमची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागाला दिले.