अर्जुनी मोरगांव तालुक्यातील बिडटोला परिसरात १० फेब्रुवारी शनिवारी रात्री वादळी पाऊस व गारपीट झाल्याने मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अचानक वादळी पाऊस आला. काही वेळाने गारपीट झाली. शेतात उभे असलेले मका पीक जमीनदोस्त झाले. याबरोबरच आम्रवृक्षाला आलेला मोहोर गळून पडला. परिसरातील झाडांना पाने शिल्लक नाहीत एवढा जबरदस्त तडाखा बसला आहे. आणखी इतर पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पंचनामे झाल्यानंतरच नुकसानीची खरी आकडेवारी पुढे येईल. झालेल्या नुकसानीची कृषी, महसूल विभाग व ग्रामसेवक यांच्या संयुक्त समितीने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जानवा येगाव परिसरातही पहाटे साडेचारच्या सुमारास झाल्याची माहिती आहे.