आदिवासी बांधवांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणार- डॉ.विजयकुमार गावित

0
7
  • जमाकुडो येथे आदिवासी लाभार्थी मेळावा

       गोंदिया, दि.26 : केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन त्याचा लाभ दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला द्यावा. आदिवासी बांधवांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

         जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा जमाकुडे येथे आयोजित आदिवासी लाभार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना डॉ. गावित बोलत होते. विशेष अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, उपविभागीय अधिकारी देवरी सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, माजी आमदार सर्वश्री संजय पुराम, उत्तमराव इंगळे, जि.प. सदस्य हनवंत वट्टी, आदिवासी शबरी महामंडळ देवरीचे संचालक भरत दुधनाग, पं.स. सदस्य सालेकसा सुनिता राऊत व अर्चना मडावी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

       डॉ. गावित म्हणाले, आदिवासी समाजाने बचत गटामार्फत विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान मागणी केलेली असून त्यानुसार आवश्यक प्रशिक्षण व अनुदान देण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव ‘ड’ यादीमध्ये नाहीत अशा सर्व आदिवासी बांधवांनी अर्ज करावेत. आलेल्या 100 टक्के अर्जदारांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल असे त्यांनी यावेळी आश्वासित केले. शेती व घरासाठी वीज कनेक्शनची गरज असलेल्या सर्व अर्जदारांना तात्काळ  वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. शेतीसाठी ट्रॅक्टर व शेतीपुरक औजारे यासाठी सुद्धा अर्थसहाय्य  देण्यात येणार असल्याचे सांगून गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असताना सुद्धा तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी होत नसल्याचे दिसून येते, त्यामुळे तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी करून देण्याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थ्यांना सर्व समावेशक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. इयत्ता आठवी पासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थी बारावीनंतर लगेच शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी तयार होणार असे डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

         यावेळी डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते सन २०२२-२३ अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना लाभाचे अर्थसहाय्य प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच आदिवासी शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मधील शबरी आदिवासी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला आदिवासी बंधू-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थीनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.